Chalisgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२२ । चाळीसगाव तालुक्यातील शेवरी येथील जिल्हा परिषद शाळेची प्रचंड दुरवस्था झाली आहे. शिक्षक स्टाफ रूमसह शाळेची संपूर्ण इमारत पावसामुळे गळत असल्याचे निदर्शनास आले असून ही शाळा 55 ते 60 वर्ष जुनी असून कौलारूने छताची बांधणी केली आहे. या कौलारुंची प्रचंड प्रमाणात झीज झाली असल्यामुळे पावसाळ्यात पाण्याची गळती होत आहे. दरम्यान, मूलभूत सुविधांकडेच दुर्लक्ष होत असल्याने धोकादायक इमारतींमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पाठवावे की नाही असा प्रश्न पालक उपस्थित करत आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात यावे यासाठी शिक्षण विभाग कोट्यवधीचा खर्च करत आहे. मात्र, येथील शिक्षण विभागाच्या जिल्हा परिषदेतील शाळेतील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. इयत्ता तिसरी व पाचवीचा वर्ग वगळता मुख्याध्यापक कॅबिनसह सर्व वर्गात पावसाचे पाणी साचले आहे. 2012 रोजी नव्याने काही खोल्या बांधण्यात आल्यात. मात्र त्यांचीही हीच परिस्थिती आहे. कौलारू शाळेचे छत अत्यंत जीर्ण झाल्यामुळे ते केव्हा कोसळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागत आहे.
शासनाने विद्यार्थांच्या जीवाशी खेळणे बंद करावे अशी विनंती पालक करत आहे. शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, शौचालयाची व्यवस्था नाही, विद्युत जोडणी नाही, यासह जुन्या इमारती यामुळे दर्जेदार शिक्षण मिळणार कसे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र या शाळेकडे शिक्षण विभागाकडून जाणून बुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप पालक करत आहेत.