जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२२ । जळगाव शहर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षामध्ये राहिलेले व कधीही बंडखोरी न केलेले निष्ठावान नगरसेवक स्वतःला मिळत नसलेल्या निधीमुळे नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी जळगाव शहरात महामार्गाची पाहणी करायला आलेल्या खा.उन्मेष पाटील यांच्याकडे भाजपच्या काही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच निधी मिळत नसल्याच्या तक्रारी देखील केल्या.
जळगाव शहर महानगरपालिकामध्ये गेल्या दीड वर्षापूर्वी अभूतपूर्व सत्ता परिवर्तन झाले. गेल्या दीड वर्षांमध्ये जळगाव महानगरपालिकेमध्ये पक्षाच्या सदस्य संख्येमध्ये फार मोठे बदल झाले आहेत. काही बंडखोरांनीतर गेल्या दीड वर्षात दोन ते तीन वेळा पक्ष बदल केले. निष्ठावान नगरसेवकांना आपल्या प्रभागाचा विकास करण्यासाठी निधी हवा आहे. मात्र केवळ शिवसेनेच्याच नगरसेवकांना तो निधी मिळत असून भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावान नगरसेवकांना तो निधी मिळत नाही, अशी तक्रार भारतीय जनता पक्षाच्या काही नगरसेवकांनी खासदार उन्मेश पाटील यांच्याकडे केली.
जळगाव शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आता वर्षभरावर आली आहे. अशावेळी स्वतःच्या प्रभागामध्ये जर विकास कामे झाली नाहीत तर येत्या काळात नागरिकांसमोर मतं मागणं अतिशय कठीण होणार आहे. पक्षाचे हक्काचे मतदार आणि समाजातील नागरिक हे जरी मतदान करतील याची शाश्वती असली तरी इतर नागरिकांचं काय? शहरातल्या नागरिकांपुढे विकासकामांशिवाय कसं जायचं? याची भीती भारतीय जनता पक्षातील काही नगरसेवकांना आहे. अशावेळी भारतीय जनता पक्षातील स्थानिक नेते या नगरसेवकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने काही नगरसेवकांनी थेट खासदार उन्मेश पाटील यांना याबाबत तक्रार केली.
यावेळी नगरसेवकांनी तर स्वतः पक्षासाठी काय काय केलं आहे याचा पाढाच खा.उन्मेष पाटील यांना वाचून दाखवला. याचबरोबर पक्षासोबत राहिलो बंडखोरी केली नाही याच फळ पक्ष निधी न देता आम्हाला अशा प्रकारे देत आहे का? असा प्रश्न यावेळी काही नगरसेवकांनी खासदार उन्मेष पाटील यांना विचारला. जळगाव लाईव्ह न्यूज प्रतिनिधीसमोरच हे सर्व घडले. दरम्यान, दुसरीकडे याबाबत जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे जळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले.