जळगाव लाईव्ह न्यूज । १० सप्टेंबर २०२२ । भारतात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी माणसांवर हल्ला केल्याच्या घटनाही घडल्या आहे. परिणामी भटक्या कुत्र्यांना मारण्याबाबत विविध संस्थांनी आदेश दिले होते. या आदेशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. विशेषत: केरळ आणि मुंबईत भटके कुत्रे धोकादायक बनले आहेत. या याचिकेवर न्यायालयात सुनावणी घेण्यात येत आहे. सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती जेके माहेश्वरी यांच्या बेंट यांनी भटक्या कुत्र्यांबाबत महत्वपूर्ण सूचना दिली आहे.
न्यायालयाने दिलेल्या सूचनेनुसार भटक्या कुत्र्यांनी माणसांवर हल्ला केला तर त्यांना अन्न देणारे जबाबदार असतील. तसेच या खंडपीठाने भटक्या कुत्र्यांच्या त्रासावर तोडगा काढण्याच्या गरजेवर भर देत भटक्या कुत्र्यांना नियमितपणे खायला घालणाऱ्या लोकांना श्वानांच्या लसीकरणासाठी जबाबदार धरले जाऊ शकते, असेही म्हणले आहे. एवढचं नाही तर भटक्या कुत्र्यांनी लोकांवर हल्ला केल्यास या कुत्र्यांना अन्न देणाऱ्या व्यक्तींनाचं उपचाराचा खर्च उचलावा लागेल, अशी सूचनाही न्यायालयाने केली आहे. तसेच लोकांची सुरक्षा आणि प्राण्यांचे हक्क यांच्यात समतोल राखण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
पुढील सुनावणी 28 सप्टेंबरला होणार
सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती खन्ना म्हणाले की, आपल्यापैकी बहुतेकजण श्वानप्रेमी आहेत. मी कुत्र्यांना अन्न देतो. पण माणसांनी श्वानांची काळजी घेतली पाहिजे. . भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तर्कशुद्ध तोडगा काढला पाहिजे, असेही न्यायमूर्ती खन्ना म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांना जबाब नोंदवण्याचे निर्देश दिले. सोबतच या प्रकरणाची पुढील सुनावणी २८ सप्टेंबरला घेण्यात येणार आहे. भारतात २०१९ पासून १.५ कोटी पेक्षा जास्त प्राण्यांच्या चाव्याच्या घटनांची नोंद झाली आहे. उत्तर प्रदेश (२७ लाख ५२ हजार २१८) त्यानंतर तामिळनाडू (२० लाख ७० हजार ९२१), महाराष्ट्र (१५ लाख ७५ हजार ६०६) आणि पश्चिम बंगालमध्ये(१२लाख ०९ हजार २३२) प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. दुसरीकडे, लक्षद्वीपमध्ये भटक्या कुत्र्यांच्या चावण्याच्या कोणत्याही घटनांची नोंद नाही.
पाळीव कुत्र्यांपेक्षा भटक्यां कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना अधिक
पाळीव कुत्र्यांपेक्षा भटक्यां कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना अधिक आहेत. २०१९ च्या गणनेनुसार, भारतात १ कोटी ५३ लाख ०९ हजार ३५५ भटके कुत्र्यांची नोंद करण्यात आली होती. उत्तर प्रदेश (२०लाख ५९हजार २६१), ओडिशा (१७लाख ३४ हजार ३९९) आणि महाराष्ट्रात भटक्या कुत्र्यांची संख्या सर्वाधिक आहे. (१२ लाख ७६ हजार ३९९). मणिपूर, लक्षद्वीप आणि दादरा आणि नगर हवेलीमध्ये शून्य भटक्या कुत्र्यांची नोंद झाली आहे.