⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | एकता : मुस्लिम विद्यार्थी, पालक आणि काका मूर्तीकाराने दिली शाळेला गणेशाची मूर्ती

एकता : मुस्लिम विद्यार्थी, पालक आणि काका मूर्तीकाराने दिली शाळेला गणेशाची मूर्ती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२२ । मुस्लिम समाजात अल्लाहचे रूप निरंकारी आहे. त्यामुळे मूर्ती हा प्रकार निषिद्ध आहे. हिंदू धर्मात प्रत्येक देवादिकाची मूर्ती आहे. अगदी दोन टोकांच्या या धर्म पद्धतीला संवेदनशीलतेचा आनंद देणारी वेगळी बातमी समोर आली. शाळेचे मूळ माहेश्वरी विद्याप्रसारक संस्थेची अभिनव माध्यमिक शाळा आहे. धर्माची भिंत श्रद्धा आणि लोकसहभागात आडवी येत नाही अशा सहिष्णु वृत्तीचा आदर्श नववीतील अवघ्या १५ वर्षांच्या आयन मझहर खान पठाण या विद्यार्थ्याने घालून दिला. पोलिसांच्या शांतता समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अशा गणेश मंडळात जाऊन सद्भावना आरती करायला हवी.

मनाला प्रसन्न करणारी ही बातमी सुरू होते अभिनव शाळेतून. कोरोना महामारीमुळे दोन वर्षे शाळेतील सण-उत्सव बंदच होते. त्यामुळे मुले-मुली कलागुण दर्शनापासून लांब होते. यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वच निर्बंध हटविले आणि गणेशोत्सवाला दुपटीने उत्साहाचे भरते आले. यावर्षीही शाळेत गणेशोत्सव साजरा करायचे ठरले. पूर्वी शाळेतील शिक्षक आणि मुले-मुली वर्गणी करून उत्सव साजरा करीत. यावर्षी मुख्याध्यापक सौ. सरोज तिवारी यांनी वर्गणी न घेता शिक्षक-पालक-विद्यार्थी सहभागातून उत्सव साजरा करायचे ठरविले. अगदी मूर्तीपासून तर पूजेचे व सजावट साहित्य ज्याला जमेल त्यांनी द्यावे असे ठरले.

इयत्ता नववीच्या वर्गशिक्षिका सौ. निता पाटील यांनी वर्गातील मुला-मुलींना उत्सवाची संकल्पना सांगितली. गणेशाची मूर्ती कोण देणार असे विचारले. त्यावर आयान खान पठाण म्हणाला, ‘मैम मी मूर्ती देतो !’ सौ. पाटील यांनीही होकार दिला. हिंदुंच्या सर्वाधिक उत्साह व जल्लोषाच्या उत्सवाला गणेशाची मूर्ती मुस्लिम विद्यार्थी देत होता. संवेदनशीलता येथेच आहे. पण ती येथे संपत नाही.

आयानने वडील मझहर खान पठाण व अम्मीला शाळेतील संकल्पना सांगितली. आयानने गणेशाची मूर्ती द्यायचा शब्द दिला आहे, तो मान्य करून ते सुद्धा मूर्ती द्यायला तयार झाले. धर्मसंस्काराचा कोणताही कडवट संस्कार पठाण कुटुंबाला आडवा आला नाही. विषयाची संवेदनशीलता अजून पुढे आहे.

शाळेत गणेशाची मूर्ती द्यायची तर ती आणावी लागेल. मझहर खान यांचे नातेवाईक (काका सासरे) अयुबखान ताजखान पठाण हे जळगाव येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार चंदुलाल रसवंतीवाले यांच्याकडे गेली २०/२२ वर्षे वेगवेगळ्या देवादिकांच्या मूर्तीचे आणि त्यावर रंगकाम करीत आहेत. आयान खानला गणेशाची मूर्ती हवी हे कळल्यानंतर त्यांनी गणेशाची आकर्षक मूर्ती तयार करून दिली. कलाकाराच्या समोरही कोणत्याही भिंती नसतात हे सिद्ध झाले. आज आयान खान याने शाळेत गणेशाची मूर्ती आणली. त्याच मूर्तीची वाजत-गाजत मिरवणूक निघाली. गणेशाच्या मिरवणुकीत शाळेतील मुलींचे लेझिम पथक होते. अभिनव विद्यालयातील अनेक उपक्रम जळगावकरांचे लक्ष वेधून घेतात.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह