जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑगस्ट २०२२ । जिल्ह्यासह ग्रामीण भागात चोरीचे प्रमाण वाढले असून भुसावळ शहरात भर दिवसा झालेल्या चोरीने खळबळ उडाली आहे. यात सुमारे २७ हजारांचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मशिरा रफिक गवळी (26, नसरवांजी फाईल. राजगौंड मंदिराजवळ, भुसावळ) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. गवळी यांच्या घरातून शुक्रवारी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास चोरट्यांनी प्रवेश करीत अडीच हजार रुपये किंमतीची व एक ग्रॅम वजनाची पोत, बाराशे रुपये किंमतीचे सोन्याचे सहा मणी, अडीच हजार रुपये किंमतीची व एक ग्रॅम वजनाची अंगठी, एक हजार सहाशे रुपये किंमतीच्या लहान मुलीच्या बांगड्या, तीन हजार रुपये किंमतीचे लहान मुलीचे जोडवे याशिवाय कमरकाटा, चांदीचे चाळ, चांदीचे पैंजण, पायातील बेडी असा एकूण 27 हजार 700 रुपयांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी गवळी यांच्या तक्रारीनुसार शनिवारी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार सुनील जोशी करीत आहेत.