जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२२ । लंपी (lumpy) साथ रोगामुळे झालेल्या पशुधनाच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी कृषीमित्र हरीभाऊ जावळे विचार मंचातर्फे अमोल जावळे यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री, ना.गिरिष महाजन, ना.गुलाबराव पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांनच्या पशुधनावर लंपी स्किन डिसिज (Lumpy Skin Disease) या साथरोगाचा प्रादूर्भाव आढळून आला आहे. मुख्यत्वे हा एक संसर्गजन्य रोग असून, तो प्राण्यांनमध्ये जलद गतीने पसरणारा आजार आहे. या साथरोगाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या महिन्याभरात जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
आजारामुळे अनेक जनावरांना आपला प्राण गमवावा लागला असून त्यामुळे पशुधन पालकांना आता आपल्या झालेल्या या नुकसानाची चिंता भेडसावत असून, यासाठी शासनातर्फे पंचनामे होऊन काही आर्थिक मदत मिळावी व गुरांच्या गोठयांमध्ये रोग प्रतिबंधक औषधांची फवारनी करणे व गुरांना तात्काळ लसीकरण करण्यात यावे ही मागणी पशुधन पालकांमार्फत होत होती.
ज्याप्रकारे शासनामार्फत लसीकरणाच्या बाबतीत तातडीने पाऊल उचललीत त्याच प्रमाणे शेतकऱ्यांनच्या या मागणीबाबतही तातडीने विचार करावा व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तिच्या निकषानुसार नुकसान भरपाई देण्यात यावी अशा प्रकारची मागणी स्व.हरीभाऊ जावळे विचार मंचातर्फे अमोल जावळे यांनी जिल्हाधिकारी जळगांव, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पशुसंवर्धन मंत्री, ना.गिरिष महाजन, ना.गुलाबराव पाटील व यांना निवेदन देऊन केली आहे.
यावेळी सोबत पाचोरा भाजपा तालुका अध्यक्ष व विकास दूध संघ संचालक अमोल शिंदे, माजी अध्यक्ष जि.प.जळगांव दिलीप खोडपे, पितांबर भावसार हे उपस्थित होते.