⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ‘जळगाव पॅटर्न’; मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते दोन्ही शिवसेनेचे!

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ‘जळगाव पॅटर्न’; मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते दोन्ही शिवसेनेचे!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । राज्यात गेल्या दोन दिवसापासून एकच चर्चा रंगते आहे ती म्हणजे शिवसेना विरुद्ध शिवसेना. सांगायचं काय तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील शिवसेनेचे आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danave) देखील शिवसेनेचे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लागेपर्यंत तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शिवसेनेतच आहेत असे म्हणावे लागेल. एकंदरीत काय तर जळगाव मनपात देखील तोच पॅटर्न आहे. महापौर जयश्री महाजन (Jayashri Mahajan) देखील शिवसेनेच्या असून विरोधी पक्षनेते सुनील महाजन (Sunil Mahajan) देखील शिवसेनेचे आहेत. राज्यात सध्या जळगाव पॅटर्न कॉपी पेस्ट केला जात आहे. कंट्रोल डीलीट केवळ सर्वोच्च न्यायालय करू शकते, त्यामुळे सर्व आलबेल आहे. Jalgaon pattern’ again in the state

शिवसेनेचे तत्कालीन नगरविकास मंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी वेगवेगळी कारणे, पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त करीत भाजपसोबत नवीन ससंसार थाटला. सध्या शिवसेना विरुद्ध शिवसेना असेच प्रमुख चित्र आहे. साधारणतः वर्षभरापूर्वी जळगाव मनपात देखील हेच घडले होते. मनपावर सत्ता स्थापन करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक मास्टर प्लॅन रचण्यात आला. भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ.राजूमामा भोळे (Rajumama Bhole) यांच्यावर नाराजी व्यक्त करीत एक मोठा गट बाहेर पडला. शिवसेनेने त्याच गटाच्या बळावर मनपात सत्ता स्थापन केली. भाजपकडून याविरुद्ध विभागीय आयुक्त आणि न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. वर्ष उलटले तरी त्यावर निर्णय झाला नसून मनपाचा पंचवार्षिक काळ सुरळीत पार पडेल असे दिसते. एकंदरीत आज राज्यात घडत असलेल्या घडामोडींची राजकीय ट्रायल एकनाथ शिंदे यांनी जळगाव मनपातच घेतली असल्याचे म्हणण्यास काही हरकत नाही.

जळगाव मनपातील आजवरची सुरेशदादा जैन (Sureshdada Jain) कम खान्देश विकास आघाडी कम शिवसेनेची सत्ता उलथवून टाकत वर्षभरात कायापालटचा वायदा करीत संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी हिसकावून घेतली होती. जळगाव मनपात भाजपचे ५७ तर शिवसेनेचे केवळ १५ नगरसेवक निवडून आले होते. विजयाचा भाजपने जंगी जल्लोष केला. एकीकडे भाजपचा जल्लोष तर दुसरीकडे शिवसेनेचे विचारमंथन असे चित्र तेव्हा पाहायला मिळाले होते. योगायोगाने तेव्हा राज्यात देखील भाजपचे सरकार होते. साधारणतः वर्षभराने राज्यातील भाजपची सत्ता गेली आणि सर्वच बिनसले. सत्ता असताना भाजपने काहीही ठोस काम न केल्याने नाराजी वाढली होती. जनतेत जशी नाराजी वाढली तशीच नाराजी अंतर्गत भाजपातही वाढली होती. भाजपातील अंतर्गत नाराजीचा फायदा घेण्यासाठी शिवसेनेने खेळी केली. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक मास्टर प्लॅन रचण्यात आला.

शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असे म्हणण्याऐवजी शिंदे यांनीच तो रचला. आज ज्याप्रमाणे राज्यातील शिवसेनेच्या अंतर्गत नाराजीचा फायदा भाजपने उचलला तसाच प्रयत्न वर्षभरापूर्वी जळगाव मनपात शिवसेनेने केला होता. जळगावातील भाजपचे काही नगरसेवक सुरुवातीला शिवसेनेने गळाला लावले. जळगावातील दोन-तीन नगरसेवकांवर नगरसेवकांना गळाला लावण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. राज्यात देखील ५ आमदारांना ती जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जळगावात बाहेर पडलेला नगरसेवकांचा मोठा गट आ.सुरेश भोळे यांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित करीत होता. भाजप जिल्हाध्यक्ष आणि आमदार म्हणून त्यांच्यावर नगरसेवकांनी आरोप केले. राज्यात देखील नुकतेच तेच घडले. सेना आमदारांनी पक्षप्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) नाराजी दाखवली आहे. जळगावातील काही नगरसेवक सुरुवातीला बंडखोरांना जाऊन सामील झाले होते मात्र नंतर पुन्हा स्वगृही येत त्यांनी आमच्या गळ्यात जबरदस्ती मफलर टाकला, असे त्यांनी सांगितलं. राज्यात देखील २-३ आमदार पुन्हा परतले आणि त्यांनी तशीच काही आपबिती कथन केली आहे.
हे देखील वाचा : Master Plan : राज्याचे सरकार उलथवून टाकण्यासाठी ‘जळगाव मनपा पॅटर्न’

जळगाव मनपातील खेळी यशस्वी झाल्यावर शिवसेनेने मोठा जल्लोष केला. मूळ शिवसेनेच्या जयश्री महाजन महापौर झाल्या तर भाजपचे बंडखोर कुलभूषण पाटील हे उपमहापौर झाले. भाजपातील बंडखोर असलेल्या इतर पदाधिकाऱ्यांचे पद देखील शाबूत राहिले. भाजपच्या गटनेत्याने व्हीप बजावला पण तो नगरसेवकांनी नाकारला. पुढे बंडखोरांनी थेट गटनेताच अमान्य असल्याचे सांगितले. सध्या राज्यात तसेच चित्र आहे. शिवसेनेचे प्रतोद आणि गटनेते हे बंडखोर आमदारांचेच झाले असून अगोदरच्या नेत्यांना नाकारण्यात आले आहे. भाजपने अचानक मोठी खेळी करीत मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव जाहीर केले तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. केंद्रातील नेतृत्वाने हा डाव खेळला. शिवसेनेत फूट पडल्यावर आमदार अपात्र, शिवसेनेचे चिन्ह, पक्षावर हक्क अशा विविध याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या. न्यायालयाकडून सुनावणीनंतर पुढील तारीख दिली जात आहे. अद्याप कामकाज सुरु असल्याने तारीख पे तारीख चे चित्र पाहावयास मिळत आहे.

सर्वोच्च न्यायालयात काय निकाल लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून असल्याने राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार लांबला होता. शिंदे गटातील आमदारांमध्ये देखील चलबिचल सुरु झाली होती. मंत्रिमंडळात सर्वांना स्थान मिळणार नाही हे तर पक्केच होते. पक्षश्रेष्ठींनी तसे सूतोवाचच दिले होते. तब्बल ३९ दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली. नवीन मंत्रिमंडळातील बहुतांश चेहरे जुनेच असल्याने गुजरात पॅटर्न फेल ठरला. मंत्रीपदाची शपथ देण्यात आली असली तरी खातेवाटप मात्र झालेले नाही. शिंदेसेनेला कोंडीत पकडण्यासाठी महाआघाडीने काही डाव रचले. राष्ट्रवादीकडून विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार यांची वर्णी लागल्याने भाजप-सेना विरुद्ध राष्ट्रवादी असे चित्र दिसून आले. दुसरीकडे विधान परिषदेत मात्र शिवसेना विरुद्ध शिवसेना असे चित्र पाहायला मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे भाजप सेनेविरुद्ध शिवसेनेचे अंबादास दानवे विरोधी पक्षनेते झाले आहे. जळगावात देखील महापौर जयश्री महाजन शिवसेनेच्या असून विरोधी पक्षनेते सुनील महाजन देखील शिवसेनेचे आहेत. जळगाव पॅटर्न पुन्हा एकदा राज्यात लागू झाला आहे.
हे देखील वाचा : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी वेबसिरीज ‘मी पुन्हा येईन’, टिझर पाहून उडेल झोप..

जळगावात भाजप नगरसेवकांनी बंडखोरी केल्यानंतर त्याविरुद्ध भाजपकडून नाशिक विभागीय आयुक्त आणि न्यायालयात अपील दाखल करण्यात आले. गेल्या वर्षभरापासून त्यावर कामकाज सुरु आहे. बंडखोरांच्या वाऱ्या सुरु आहेत. सर्वांचे सुरळीत सुरु असून आजवर पक्षनेत्यांनी निधी देखील उपलब्ध करून दिला. राज्यातील घडामोडी लक्षात घेता उद्या उठून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेला तर एकनाथ शिंदे सरकारला धक्का बसू शकतो. केंद्रात भाजपची सत्ता असल्याने उद्या काही झाले तरी आपल्याला किमान अडीच वर्षे तरी भाजप मदत करेल असा विश्वास एकनाथ शिंदे गटाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जळगाव मनपाचा अनुभव असल्याने ते कायदेशीर बाबी व इतर घडामोडींमध्ये ताक देखील फुंकून पिण्याची भूमिका स्वीकारून आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेच्या चिन्हावर दावा केला जात असून जळगाव मनपावर घेतलेल्या ट्रायलचा प्लॅन शिंदे यांनी स्वतःचा आयुष्यात देखील प्रत्यक्षात आणला असे म्हणावे लागेल. एकंदरीत जळगावातील राजकारणावर बहुतांशवेळी राज्याचे राजकारण ठरत असते हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. जिल्ह्यातील राजकारणी राज्यातील सूत्र हलवीत असतात आणि अनेकदा जळगावची जागा सोडण्यावरून देखील राज्याच्या राजकारणात मोठे बदल झाल्याचे आजवरचा इतिहास आहे.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.