⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | शहराच्या विकासाची वि’जयश्री’ शोधणाऱ्या महापौरांना स्वपक्षीयांकडून ‘वनवास’!

शहराच्या विकासाची वि’जयश्री’ शोधणाऱ्या महापौरांना स्वपक्षीयांकडून ‘वनवास’!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहर मनपा प्रशासन आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांचे सूत जुळले असे गेल्या दहा-पंधरा वर्षात तरी पाहायला मिळाले नाही. जळगाव शहराला पहिल्यांदाच महापौर आणि आयुक्त म्हणून महिला मिळाल्या असून दोघे उच्चशिक्षित आहे. महापौर जयश्री महाजन यांचा सुरळीत सुरू असलेला कारभार काही स्वकीयांच्या नजरेत भरू लागला असून घरातूनच आग लावण्याचे काम केले जात आहे. मनपा आयुक्त व प्रशासकीय अधिकाऱ्यांना स्वपक्षीय कानभरणी करीत असून त्यामुळेच महापौर विरुद्ध मनपा असे चित्र पाहायला मिळत आहे. महापौर जयश्री महाजन जळगावच्या विकासाची वि’जयश्री’ खेचू पाहत असताना स्वपक्षीयांमुळे त्यांना १४ महिन्यांचा मनपातील वनवास भोगावा लागला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जळगाव शहर मनपा महापौर जयश्री महाजन व मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांचे काही जमत नसल्याची कुजबुज मनपात सुरू आहे. अनेक वर्षापासून जळगाव शहराचा विकास रखडत आहे त्यातच दरवर्षी सेवानिवृत्त होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जळगावकरांच्या जबाबदारीचे ओझे येऊन पडले आहे. जळगाव शहरच्या विद्यमान आयुक्त विद्या गायकवाड आणि सत्ताधारी महापौर जयश्री महाजन यांच्यात सध्या शीतयुद्ध पाहायला मिळत आहे. नुकतेच पार पडलेल्या महासभेत देखील याचे पडसाद उमटले. महापौर जयश्री महाजन यांनी कामे होत नसल्याने भर महासभेत अधिकाऱ्यांना खडे बोल सुनवत हात जोडून कामे मार्गी लावण्याची विनंती देखील केली.

एकीकडे आयुक्त प्लास्टिक विक्रेत्यांवर धडक कारवाई करताना दिसून येत असताना दुसरीकडे सत्ताधाऱ्यांच्या मागण्यांकडे सपशेल दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप देखील झाला. प्लास्टिकवर कारवाई तर हॉकर्सला हफ्ते घेऊन अभय दिले जात असल्याच्या आरोपानंतर तर मनपाच हादरली. जळगाव शहर मनपात शिवसेनेची सत्ता आली आणि महापौर म्हणून जयश्री महाजन विराजमान झाल्या. तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा विजय झाल्याने पुढे महापौरांचा सुरळीत कारभार सुरू झाला. महापौर जयश्री महाजन उच्चशिक्षीत असल्याने मंत्री, पक्षश्रेष्ठी, नेते मंडळी व शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे कसब त्यांना सहज जमले. मनपाला निधी प्राप्त होऊन कमी-अधिक का असेना कामे होऊ लागली.

योगायोगाने जळगाव शहराचा अनुभव असलेल्या डॉ.विद्या गायकवाड याच आयुक्त म्हणून जळगाव मनपात रुजू झाल्या. आयुक्त आणि महापौर दोघे महिला असल्याने शहराचा विकास झपाट्याने होणार, रखडलेली कामे मार्गी लागणार असा आशावाद जळगावकरांमध्ये निर्माण झाला. दोघींच्या नारीशक्तीची सुरुवात चांगली झाली आणि तिथेच माशी शिंकली. महापौर जयश्री महाजन यांनी करून दाखविले तर सर्व श्रेय त्या घेतील आणि भविष्यात आपल्याला कमी महत्व मिळेल अशा वादातून कुरघोडीची सुरुवात झाली. महापौरांविरुद्ध स्वपक्षीयांकडून वातावरण निर्मिती केली जाऊ लागली. आयुक्तांची कानभरणी होऊ लागली. शहरात असल्या तरी नवख्या असल्याने आयुक्तांमध्ये शीतयुद्ध रंगू लागले.

जळगावात महापौर जयश्री महाजन यांचा वर्षभराचा कार्यकाळ स्वपक्षीयांची अडचणींमुळे खडतररीत्या पार पडला तर दुसरीकडे राज्यात शिवसेना फुटली. जळगाव शिवसेनेचे देखील काही बंडखोर शिंदे गटात सामील झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच हवेचा प्रवाह भविष्यात बदलणार हे लक्षात घेऊन महापौर विरोधी गट जरा चार्ज झाला. जयश्री महाजन यांना आपला उर्वरित कार्यकाळ देखील सुरळीतपणे पार पाडता येऊ नये म्हणून सक्रिय झालेले ते स्वपक्षीय विकासकामात कसा खोडा घालता येईल याचा अधिक कसोशीने प्रयत्न करू लागले. कामे न झाल्यास महापौरांवर दबावतंत्राचा वापर करता येईल शिवाय नागरिकांच्या शिव्या भेटून महापौरांची बदनामी होईल याची व्यवस्था सध्या केली जात आहे.

जळगाव शहराचे महापौर ललित कोल्हे असताना देखील त्यांना हवे तसे काम करू दिले जात नव्हते. कोल्हे आमदारकीला जड ठरू शकतात आणि ऐनवेळी पक्षांतर करीत धक्कातंत्र देऊ शकतात याचा अंदाज बांधत त्यांना मोजकीच कामे करू देण्यात आली. इतर कामात ठरवून खोडा घालण्यात आला. सध्या महापौर जयश्री महाजन यांच्या बाबतीत देखील तोच फंडा वापरला जात आहे. एकंदरीत सांगायचं काय तर मनपा सरकार जरी महापौरांचे असले तरी ते चालवण्याची धमक बाळगून बसलेले मनपा आश्रमचे बाबाजी आणि भोपा स्वामी कुणी वेगळेच आहे. महापौरांची बदनामी झाली आणि त्यांना मागे ओढले तरी आपण आपल्या जागी आरामात राहू हे त्यांना माहिती आहे. बाकी जळगावकर मतदार भक्तगण काय जे दिसेल ते सत्य मानून सहन करतील.

महापौरांना १४ महिन्यांचा वनवास?
प्रभू श्रीरामचंद्रांना घर सोडून १४ वर्ष वनवास भोगावा लागला होता. जळगाव मनपात देखील महापौर जयश्री महाजन यांना १४ महिन्यांचा उलट वनवास भोगावा लागल्याचे दिसत आहे. महापौर महत्वाचे पद असल्याने शहराच्या विकासासाठी मंत्रालयात त्यांना पाठपुरावा करायला जावेच लागते. परंतु गेल्या १४ महिन्यांच्या कार्यकाळात महापौरांनी मुंबई गाठली असे काही ऐकण्यात आले नाही. शहरातील विकास कामे आणि प्रलंबित प्रश्नांसाठी महापौरांनी जळगावातून भलामोठा पत्र व्यवहार केला असला तरी त्यांना मुंबई वारी करण्यापासून रोखण्यात आले का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापौरांना १४ महिन्यांचा जळगावातच राहण्याचा वनवास भोगावा लागल्याचे आता काहीसे स्पष्ट होत आहे.

अडथळे निर्माण करणाऱ्यांची नावे लवकरच जाहीर करणार : सुनील महाजन
जळगाव मनपात शिवसेना विरोधात बसल्यावर मला विरोधी पक्षनेते म्हणून संधी मिळाली. अडीच वर्षांनी जळगाव मनपात आमच्या नेत्यांनी केलेल्या करेक्ट कार्यक्रमामुळे शिवसेनेचा भगवा फडकला. महिला महापौर पद राखीव असल्याने पक्षश्रेष्ठीच्या आशिर्वादाने महापौर म्हणून जयश्री महाजन यांना संधी मिळाली. उच्चशिक्षित महापौर असल्याने त्यांच्या कामकाजात काही असंतुष्ट तत्व अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. जळगाव शहराचा विकास होऊच न देण्याचा काहींचा मनसुबा आहे. शहराच्या विकासात बाधा निर्माण करणाऱ्यांचा मनसुबा कधीच यशस्वी होणार नसून योग्य वेळ आल्यावर त्यांची नावे देखील जाहीर करेल, अशी प्रतिक्रिया मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी ‘जळगाव लाईव्ह न्यूज’शी बोलताना दिली आहे.

नावे जाहीर केल्यास होणार भूकंप!
अगोदरच अडीच वर्ष विरोधात बसलेल्या शिवसेनेला पुन्हा मनपात संधी मिळाली. योगायोगाने राज्यात देखील महाआघाडीचे सरकार होते. महापौर आणि काही सदस्यांनी निधीसाठी पाठपुरावा केला परंतु निधी आल्यावर काहींनी खोडा घातला. शहराचा हवा तसा विकास झाला नाही. राज्यात आता शिवसेनेतच फूट पडली असल्याने पुढील पंचवार्षिकला मनपावर भगवा फडकविण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. तत्पूर्वी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी नावे जाहीर केल्यास शिवसेनेतील गटबाजी उघडी पडेल. जळगावातील शिवसेनेतच राजकीय भूकंप पाहायला मिळेल यात शंका नाही.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.