जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२२ । जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातील गैरकारभाराबाबत तक्रार करण्यात आली होती. आता मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाने चौकशीसाठी शासनाने एक चौकशी समिती गठीत केली आहे. यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्हा दूध संघातील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी नागराज जनार्दन पाटील यांनी आ.गिरीश महाजन यांच्या पत्रान्वये विनंती केली होती. राज्यात सत्तांतर होताच चौकशी समितीची झालेली नेमणूक एकनाथराव खडसे गटाला धक्का मानला जात आहे.
यासंदर्भात आज महाराष्ट्र शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग यांनी एक आदेश काढला आहे. या आदेशाची प्रत दुग्धव्यवसाय विकास विभागाचे आयुक्त यांना पाठविण्यात आली आहे. या आदेशात म्हटले आहे की, जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या गैरकारभाराची चौकशी करण्याबाबत आ. गिरीश महाजन यांच्या ८ जुलै २०२२ रोजी पत्रान्वये नागराज जनार्दन पाटील यांनी जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या चेअरमन, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांनी केलेल्या अनियमिततेच्या संदर्भात तक्रारीची चौकशी करुन कारवाई करण्याची विनंती केली होती. त्यास अनुसरुन मा. मुख्यमंत्री यांचे “तपासून तात्काळ कार्यवाही करावी” असे निर्देश दिले आहेत.
मुख्यमंत्री यांचे निर्देश विचारात घेऊन जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची नागराज पाटील यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने तपासणी करण्यासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे. असे आदेशात म्हटले आहे. समितीमध्ये अध्यक्ष : स.शा. पुरव, विशेष लेखापरीक्षक वर्ग-१, सहकारी संस्था (मत्स्य), मुंबई, सदस्य : कै.मो.दळवी, लेखापरीक्षक श्रेणी-१, सदस्य : आ.ई. नलावडे, लेखापरीक्षक श्रेणी-१, सदस्य : यो.र.खानोलकर, लेखापरीक्षक श्रेणी-१, सदस्य : जु. रु. तडवी, लेखापरीक्षक श्रेणी-१ यांचा समावेश आहे.