जळगाव लाईव्ह न्युज । १९ जुलै २०२२ । देशात महागाईने आधीच कळस गाठला आहे. वाढत्या महागाईमुळे जनता होरपळून निघत असताना केंद्र सरकारने ज्या गोष्टी जीएसटीच्या कक्षेत नव्हत्या त्यांच्यावर जीएसटी आकारायला सुरुवात केली होती. यानंतर जनतेत प्रचंड रोष निर्माण होऊ लागला आहे. अशातच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट करून सांगितले की, १४ वस्तू सुटे घेतल्यास त्यावर कर आकारला जाणार नाही.
केंद्र सरकारने सुट्या धान्यावर देखील पाच टक्के जीएसटी आकारला होता. त्यात सुट्या डाळी, गहू, राई, ओट्स, मका, तांदूळ, पीठ, रवा, बेसन, मुढी, दही आणि लस्सी यावर पाच टक्के जीएसटी १८ जुलैपासून लागू करण्यात आला होता. मात्र अशातच आज मंगळवारी एका ट्विटमध्ये माहिती देत अर्थमंत्र्यांनी ११ वस्तूंची यादी जोडताना स्पष्ट केले की, जर या यादीत समाविष्ट असलेल्या वस्तू सुटे, अनपॅक किंवा लेबलशिवाय खरेदी केल्या गेल्या असतील तर या वस्तूंना जीएसटीमधून सूट दिली जाईल. या वस्तूंमध्ये डाळी, गहू, राई, ओट्स, मका, तांदूळ, मैदा, रवा, बेसन, दही आणि लस्सी यांचा समावेश करण्यात आला आहे.
सीतारामन यांनी लिहिले की, जीएसटी परिषदेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत डाळी, दही आणि मैदा यासारख्या काही वस्तूंवर जीएसटी लावण्याच्या दृष्टिकोनावर पुनर्विचार करण्याची शिफारस करण्यात आली होती. याबाबत अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. खाद्यपदार्थांवर प्रथमच कर लावण्यात येत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र यात तथ्य नाही. जीएसटी लागू होण्याआधीच राज्ये अन्नधान्यावर महसूल गोळा करत होते.