गिरणा पात्रात एक विद्यार्थी बुडाला, तिघांना वाचविण्यात यश, रात्र झाल्याने थांबवली शोध मोहीम
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२२ । जिल्हयातील धरणगाव तालुक्यात बांभोरी जवळ गिरणा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या चार तरुण बुडाल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. या घटनेत स्थानिक नागरिकांना तीन तरुणांना वाचविण्यात यश आले मात्र विशाल जोहरे वय १६ हा बेपत्ता झाला आहे. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते मात्र ते थांबवण्यात आले. उद्या रविवारी पुन्हा शोधकार्य हाती घेतले जाईल.
अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील यश पप्पु भालेराव (वय १४), प्रेम परशुराम झांझळ (वय १५), मुयर संतोष सपकाळे (वय १५, रा. शिवाजी नगर) व विशाल हिलाल जोहरे (वय १६) हे चौघे तरुण शनिवारी दुपारी नदीत पोहायला गेले होते. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे चौघे जण बुडायला लागले. यावेळी एका स्तानिकाने दिसताक्षणी तात्काळ पाण्यात उडी घेत यश, परशुराम व प्रेम या तिघांना पाण्यातून बाहेर काढले. परंतु तो पर्यंत विशाल पाण्यात बेपत्ता झाला.
घटनेची माहिती मिळताच पाळधी दुरक्षेत्रचे पोलीस अंमलदार गजानन महाजन, ज्ञानेश्वर बाविस्कर, किशोर चंदणकर, प्रवीण सुरवाडे, तालुका पोलिस ठाण्याचे संजय भालेराव यांच्यासह तहसिल व अग्निशमन विभागाचे लोक घटनास्थळी दाखल झाले. परंतु रात्री उशिरापर्यंत पाण्यात शोधकार्य सुरू होते मात्र विशाल सापडू शकला नाही.