⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | …म्हणून जळगाव शहरात सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार केले जात नाही!

…म्हणून जळगाव शहरात सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार केले जात नाही!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । एखाद्याच्या नशिबी अठरा विश्वे दारिद्य्र असते अन् त्यातच नशीब फुटके. जळगाव शहराची देखील अशीच काहीशी अवस्था सध्या झाली आहे. जळगाव शाहहर मनपाला निधी मिळेना आणि मिळालाच तर तो खर्च करता येईना असे होऊन बसले आहे. शहरात गेल्या अनेक वर्षापासून रस्तेच तयार झाले नव्हते त्यात अमृत योजना आणि भूमिगत गटारीच्या कामाने रस्त्यांची तर पार वाटच लावली. खड्डेमय रस्त्याने जळगावकरांना मंगळावर राहत असल्याचा अनुभव येऊ लागला. जळगाव शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली परंतु त्यात बहुतांश रस्ते डांबरीच आहेत. सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करण्याची मागणी होत असताना जादा खर्चाची बाब पुढे करीत त्यास नकार दिला जातो. जळगाव लाईव्हने याच विषयाच्या मुळाशी जाऊन शोध घेतला असता डांबरी रस्ता आणि सिमेंट रस्त्याच्या कामात केवळ ३० टक्के वाढ होते मात्र तो जास्त टिकाऊ असल्याने केला जात नसल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.

जळगाव शहर आज एक मजाक होऊन बसले आहे. नागरिकांच्या तक्रारी, राजकारण्यांचे प्रयत्न, शासनाकडून मिळणारा निधी, थकलेले मनपा व्यापारी संकुलांचे भाडे आणि प्रशासकीय अनास्था यामुळे सर्वच रखडले आहे. जळगावात मोजके प्रभाग, ठराविक रस्तेच विकसित होत आहेत. तर उर्वरित जळगाव असेच उघडे पडले आहे. जळगाव शहरात अटलांटा कंपनीने रस्ते तयार केले त्यानंतर बहुदा कुठेच रस्ते तयार झालेले नाही. अमृत, भूमिगत गटारीनंतर शहरातील काही रस्ते तयार करण्यात आले आहे. नवीन तयार केलेले बहुतांश रस्ते डांबरी आहेत परंतु ठराविक गल्लीतच काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. जळगावात गेल्या काही वर्षांपासून डांबरी रस्ते तयार केले जात असून काँक्रीटच्या रस्त्यांसाठी जास्तीचा खर्च लागत असल्याचे कारण देण्यात येत आहे.

असे असतात डांबरी रस्त्याचे थर
एखादा डांबरी रस्ता तयार करताना आपल्याला तो कसा तयार केला जातो याची माहिती असणे आवश्यक आहे. पूर्णतः डांबरी रस्ता तयार करताना पहिला थर WBM म्हणजेज मातीकाम, दुसरा थर BBM/MPM म्हणजेच खडीकरण, तिसरा थर म्हणजे BM म्हणजेच (५५ टक्के पाऊण इंची खडी, ३५ टक्के अर्धा इंची खडी, १५ टक्के कच) असे प्रमाण असलेला थर. ५० टन वजनापेक्षा अधिकच्या वाहनांची वाहतूक असलेल्या रस्त्यावर हा थर अंथरणे आवश्यक असते. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तयार केले जाणारे MDR (Major District Road) किंवा राज्य मार्ग तयार करताना BM अंथरला जातो. चौथा थर CARPET म्हणजेच खडी मिश्रणचा थर (कच २५ टक्के तर अर्धा इंची खडी ७५ टक्के). सर्वात शेवटी असतो तो सिलकोट म्हणजेच डांबरी बिटुमीन्सचा थर. काही रस्त्यांवर ट्रककोट देखील अंथरला जातो.

असे असते डांबरी रस्त्याचे गणित
डांबरी रस्ता तयार करताना आजच्या साहित्य दरानुसार प्रति चौरस मीटर रस्ता तयार करण्यासाठी ५०० रुपये खर्च येतो. शहरातील एका डांबरी रस्त्याचे आयुष्य साधारणतः ३ ते ५ वर्ष असते. तसेच त्या रस्त्याची देखभाल दुरुस्ती आणि खड्डे बुजविण्यासाठी साधारणतः ३० टक्के खर्च येतो. जळगाव शहरात बरेच रस्ते डांबरीच तयार करण्यात आले आहेत. नागरिकांकडून डांबरी रस्त्यावर पाणी टाकणे, काहीही कामानिमित्त रस्ता खोदणे अशी कार्ये केली जात असल्याने देखील रस्ता लवकर खराब होत असतो.

असे असते सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे गणित
पूर्णतः सिमेंटचा रस्ता तयार करताना सर्वात अगोदर WBM म्हणजेच मातीकाम, त्यानंतर M-10 म्हणजेच PCC सिमेंट, खडी, रेती मिश्रीत थर, सर्वात शेवटी M-25 म्हणजेच सिमेंट, रेतीचा थर अंथरला जातो. सिमेंटचा रस्ता तयार करण्यास प्रति चौरस मीटर ७०० रुपये खर्च येतो. प्रामाणिकपणे नियमानुसार तयार केलेल्या सिमेंटच्या रस्त्याचे आयुष्य साधारणतः १५ वर्ष असते. सिमेंटच्या रस्त्याची देखभाल दुरुस्ती आणि खड्डे बुजविण्यासाठी मूळ रकमेच्या केवळ ५ टक्के खर्च येतो. जळगाव शहरात आजी-माजी महापौर, उपमहापौर, दिग्गज नगरसेवकांच्या घराजवळ सिमेंटचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. गेल्या १० वर्षात अनेक ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात आले होते मात्र काम गुणवत्तापूर्ण नसल्याने ते कधीच धुळीस मिळाले.

खड्डे बुजविताना खर्च वाढविण्याचा असा ही फंडा
जळगाव शहरात गेल्या काही वर्षात नवीन रस्ते अत्यल्प प्रमाणात तयार करण्यात आले असले तरी रस्त्यांची दुरुस्ती वारंवार केली जाते. विशेषतः खड्डे बुजविण्याचे काम दरवर्षी म्हणा किंवा दर महा काढले जाते. खड्डे बुजविताना देखील २-३ प्रकार आहेत. खड्डे केवळ मुरूम किंवा बांधकामाचे वेस्ट मटेरियल टाकून देखील बुजविण्यात येतात परंतु तो तात्पुरता आधार असतो. बऱ्याचदा तर मुरूम पावसाने चिखल होऊन वाहन चालकांना अधिक त्रास होतो. खड्डे भरण्यासाठी पेव्हर ब्लॉक पद्धतीचा उपयोग केल्यास त्याचा खर्च साधारणतः १२० रुपये प्रति चौरस मीटर असा येतो. त्यात देखील तुटलेले किंवा शिल्लक पेव्हर वापरल्यास आणखी १० टक्के खर्च कमी होऊ शकतो. पेव्हर ब्लॉकने दुरुस्त केलेले खड्डे साधारणतः ५ महिने टिकू शकतात. दुसरी एक पद्धत म्हणजे खडी, डांबर टाकून दुरुस्ती. अशा पद्धतीसाठी प्रति चौरस मीटर ३०० रुपये खर्च येतो. या पद्धतीने केलेली दुरुस्ती २ ते ३ महिने टिकते.

सोशीक जळगावकरांच्या करावर डल्ला मारण्याचे धंदे
जळगाव शहरात बरेच रस्ते डांबरी तयार करण्यात येत आहेत. शहराच्या विकासासाठी कोटींचा निधी भेटत असल तरी त्यात डांबरी रस्त्यांची कामे घेतली जातात. खर्चाचे कारण देण्यात येत असले तरी त्यामागे जळगावकरांच्या करावर डल्ला मारण्याचाच हेतू दिसून येतो. शहरातील रस्त्यांची कामे करणारे मक्तेदार बहुदा मनपा नगरसेवक किंवा त्यांचेच कार्यकर्ते असतात. सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार केल्यास तो पंधरा वर्ष टिकेल आणि तसे झाल्यास पुन्हा रस्त्यांची कामे करणे शक्य नाही. डांबरी रस्ता ३-५ वर्ष टिकला तरी एक पंचवार्षिक सेट होऊन जाते. नागरिक तर समाधानी होताच शिवाय मलिदा देखील खायला मिळतो. खड्डे बुजविण्यासाठी पेव्हर ब्लॉक पद्धतीचा उपयोग न करणे हे देखील एक मलिदा खाण्याचे काम आहे. जळगावकरांना खड्ड्यांची सवय झालीच आहे परंतु जर सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार केल्यास किमान पुढील अनेक वर्ष जळगावकर आपले नाव काढतील आणि पुन्हा पुन्हा निवडून देतील हे नगरसेवकांना लक्षातच घ्यायचे नाही.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.