जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२२ । एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे संकटात आलेली महाविकास आघाडी सरकार अखेर कोसळली. उद्धव ठाकरे यांनी काल रात्री मुखमंत्रीपदाचा आणि विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा राज्यपालांकडे दिला. यामुळे आता भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री पदी विराजमान होण्यासाठी सज्ज आहेत. मात्र टीम देवेंद्रच्या नेतृत्वात इतर मंत्र्यांना कोण-कोणती खाती मिळणार, याचीही उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे. मात्र या सगळ्यात चर्चेचा विषय बनला आहे तो म्हणजे भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा
गेल्या काही दिवसापूर्वी विधान परिषद निवडणूक पार पडली. यात भाजपने पंकजा मुंडे याना डावल्याने त्या नाराज असल्याच्या चर्चा आहेत. मात्र अशातच उद्धव ठाकरे यांनी काल मुखमंत्रीपदासह विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. त्यामुळे त्यांच्या जागी पंकजाताईंना नियुक्त केलं जावं, अशी मागणी पंकजांच्या कार्यकर्त्यांकडून जोर धरू लागली आहे. सोशल मीडियावर पुन्हा एकदा पंकजांचे कार्यकर्ते प्रचंड अॅक्टिव्ह झाले आहेत. त्यामुळे पंकजांना पुन्हा संधी मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार मुंबईत परतण्याची शक्यता आहे. शिंदे गट काल रात्री गोव्यातील ताज कन्व्हेंन्शन सेन्टर या हॉटेलमध्ये मुक्कामी होते. गोव्यातून हे बंडखोर आमदार मुंबईत परतण्याची शक्यता आहे. या बंडखोरांच्या स्वागतासाठी भाजपनं जय्यत तयारी केली आहे. दुसरीकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सीआरपीएफचे दोन हजार जवान मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे कडक सुरक्षाव्यवस्थेत शिंदे गटाची घरवापसी होणार आहे. महाराष्ट्रात वापसी झाल्यानंतर शिंदे गटाचा पुढचा प्लॅन काय असेल याकडं साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.