⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

खडसेंच्या स्वागताकडे पदाधिकार्‍यांची पाठ; राष्ट्रवादी कार्यालयाबाहेरच पुष्पगुच्छ स्विकारुन मुंबईला रवाना

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२२ । विधान परिषद निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आज प्रथमच आमदार एकनाथराव खडसे (Eknathrao Khadse in Jalgaon) जळगावला येणार असल्याने जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात त्यांच्या स्वागताचे नियोजन करण्यात आले होते. मात्र राज्यात निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्‍वभूमीवर खडसे गुरुवारी सकाळी मुंबईकडे रवाना झाले. दरम्यान मुंबईला जात असतांना त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयासमोर दोन मिनिटे थांबून सत्कार स्विकारला. मात्र यावेळी राष्ट्रवादीचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता. केवळ खडसे समर्थ कार्यकर्त्यांनी खडसेंचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यामुळे राष्ट्रवादीतील गटबाजीचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजपाकडून एकनाथराव खडसे यांचा पराभव करण्यासाठी शक्ती पणाला लावण्यात आली होती. मात्र खडसेंचा दणदणीत विजय झाला. खडसेंच्या गळ्यात आमदारकीची माळ गळ्यात पडल्यामुळे जिल्हा राष्ट्रवादीची ताकद वाढेल, अशी अपेक्षा आहे. मात्र सुरुवातीपासून राष्ट्रवादी व खडसे समर्थक असे दोन गट स्पष्टपणे दिसून येतात. याची प्रचिती आज खडसेंच्या स्वागत व सत्काराच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आली.

विधानपरिषद निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर एकनाथराव खडसे हे मंगळवारी रात्री मुंबईहून मुक्ताईनगरला आले होते. जळगावला आल्यानंतर त्यांच्या जंगी सत्काराचे नियोजन देखील करण्यात आले होते. मात्र एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकवल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले आहे. याच पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीने सर्व वरिष्ठ नेत्यांना मुंबईत बैठकीसाठी बोलविले आहे. यामुळे खडसे गुरुवारी सकाळीच बायरोड मुंबईकडे रवाना झाले.

मुक्तईनगरातील निवासस्थानावरुन कारने मुंबई निघाल्यानंतर खडसे सकाळी ११ वाजेच्या सुमारास जळगावला आले. त्यांची कार राष्ट्रवादी कार्यालयासमोर पोहचल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयात न जाता रस्त्यावरच पुष्पगुच्छ स्विकारला. सध्या राज्यात निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेमुळे त्यांनी सत्कार-सत्काराचा कार्यक्रम रद्द करून तातडीने मुंबईला जाणे पसंत केले. त्यांची ही कृती राजकीय प्रगल्भता दर्शवणारीच होती मात्र त्यांच्या स्वागतावेळी केवळ खडसे समर्थक १०-१२ कार्यकर्तेच उपस्थित होते. ही बाब खटकणारी आहे.

खडसेंच्या रुपाने जिल्हा राष्ट्रवादीला मोठी ताकद मिळाली असली तरी यामुळे सर्वांनाच आनंद झालेला नाही, असे चित्र जिल्हा राष्ट्रवादीत दिसते. यामुळे मुळ राष्ट्रवादी व खडसे समर्थक असे दोन गट दिसून येतात. आजही खडसेंच्या स्वागतावेळी राष्ट्रवादीचा एकही नेता किंवा पदाधिकारी उपस्थित नव्हता. यामुळे राष्ट्रवादीतील गटबाजी पुन्हा एकदा अधोरेखीत झाली आहे.