जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२२ । महिला वृद्धेस एक लाख उधारी देत नसल्याने डोक्यावर वीट मारली, गळा दाबुन जीवेठार मारण्याचा प्रयत्न करून घरातील १० तोळे सोन्याच्या दागिन्यासह १ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना धरणगाव तालुक्यातील चावलखेडा येथे घडली. याबाबत वृद्धेच्या मुलाने पोलिसांत तक्रार दिली असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिठाबाई नारायण पाटील (वय 64) असे जखमी वृद्धेचे नाव आहे. गावातीलच आरोपी दीपक प्रल्हाद पाटील याने ही चोरी केली आहे. वृद्धेचा मुलगा जगदीश नारायण पाटील यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मिठाबाई नारायण पाटील ( वय ६४ रा. चावलखेडा ता. धरणगाव, जळगाव ) या चावलखेडा येथे शेती असल्याने घरी एकट्या असतात. तर त्यांचे २ मुले, २ मुली जळगावला राहतात. दि.२१ रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास गावात राहणारा किराणा दुकानदार आरोपी दीपक प्रल्हाद पाटील (वय ४७) गेल्या २ महिन्यांपासून ५० हजार रुपये मागत होता. या कारणावरून आरोपी दीपक प्रल्हाद पाटील याने वृद्धेच्या डोक्यावर वीट मारली, गळा दाबुन जीवेठार मारण्याचा प्रयत्न करून घरातील १० तोळे सोन्याच्या दागिन्यासह १ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.
दोन्ही महिलांना मारहाण
आरोपी दीपक प्रल्हाद पाटील हा वृद्धेस मारहाण करत असल्याचे गावातील एका महिलेला लक्षात आले. त्या महिलेने आरोपी यास रोखण्याचा प्रयत्न केला असता तिलाही मारहाण करण्यात आली. त्यांनतर आरोपीने पाच तोळे सोन्याच्या बांगड्या, तीन तोळ्याची पोत, दोन तोळ्याच्या साखळ्या, आठ ग्रॅमचे कानातले व पाच ग्रॅमच्या अंगठ्या तसेच एक लाख रुपयांची रोकड असा ऐवज लंपास केला. या झालेल्या हल्ल्यात मिठाबाई गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर शहरातील एका रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहोत. शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी बुधवार 22 जून रोजी रात्री पोलिसांना झालेल्या प्रकारबद्दल माहिती दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र कोळी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.