गेल्या अडीच वर्षात फायदा फक्त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक भरडला गेला – एकनाथ शिंदे
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२२ । गेल्या अडीच वर्षात महा विकास आघाडीच्या सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक भरडला गेला. याच बरोबर घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण करण्यात आले. अशावेळी पक्ष आणि शिवसैनिक टिकवण्यासाठी नैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे आवश्यक असून महाराष्ट्रासाठी आता निर्णय घेणे गरजेचे आहे असे ट्विट शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक भावुक भाषण करत शिवसैनिकांना भावुक केले. जर तुम्हाला माझा राजीनामा हवा असेल तर माझ्या समोर या आणि राजीनामा घेऊन जा असे आव्हान बंडखोर असलेल्या शिंदे गटाला केले. गेल्या अडीच वर्षात तुम्हाला शिवसेनेने काय नाही दिला तेही सांगा असेही म्हणाले. यावर एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले असून उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला जशास तसे उत्तर दिले आहे.
शिवसेनेत सध्या उभी फूट पडली असून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे विरोधात उद्धव ठाकरे असे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुमारे ४६ आमदार गुवाहाटी येथे दाखल झाले असल्याचे म्हटले जात आहे. शिंदे यांचे बंड मोडून काढण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरु होते. बंडखोरांना पुन्हा बोलाविण्यासाठी शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभु यांनी एक पत्र शिवसेनेच्या सर्व आमदारांना पाठवलं होते. पत्रकात सर्व आमदारांना ५ वाजेपर्यंत मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी ट्विट करीत शिवसेना प्रतोदांनी काढलेला व्हीप बेकायदेशीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील एक भावुक भाषण करत शिवसैनिकांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावर आता एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आहे.