विधान परिषद निवडणूक : अपक्ष आमदार संजयमामा शिंदे महाविकास आघाडीला देणार मत
जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२२ । विधान परिषदेच्या दहा जागांसाठी सध्या विधान भवनात मतदान प्रक्रिया सुरु आहे. आमदार कोण होणार ? हे पाहणे उत्सुकतेचे असल्याने प्रत्येक मत महत्वाचे आहे. त्यात महाविकास आघाडी तसेच भाजपाचे आमदार क्रमाक्रमाने मतदान करत आहेत. यावेळी अपक्ष आमदार संजयमामा शिंदे महाविकास आघाडीला मत देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यसभेच्या निवडणुकीवेळी संजय राऊत यांनी ज्यांच्यावर शंका उपस्थित केली होती यावर बोलताना अपक्ष आमदार संजयमामा शिंदे म्हणाले कि, संजय राऊतांनी जे वक्तव्य केले होते, तो विषय संपला आहे. माझे मत महाविकास आघाडीलाच आहे.
“राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये मी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. यावेळी विधान परिषदेच्या निवडणुकीलाही मी महाविकास आघाडीलाच मतदान करणार आहे. संजय राऊत हे राज्यातील वरिष्ठ नेते आहेत. देशपातळीवर ते स्वाभिमानने राज्याची बाजू मांडतात. त्यांच्याकडून ते वक्तव्य गैरसमजूतीतून आले असले तरी त्यांनी नंतर त्याबद्दल स्पष्टीकरण दिलं होतं. अनावधानाने हे वक्तव्य केले असे राऊत म्हणाले होते. आता तो विषय संपला आहे. महाविकास आघाडीचाच विजय होणार आहे,” असे संजयमामा शिंदे म्हणाले आहेत.