⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | गुन्हे | Hip Hop DSP : रॅपर्सच्या स्पर्धेतून रंगवली भिंत, पोलिसांनी पकडताच तो म्हणू लागला ‘रॅप सॉंग’

Hip Hop DSP : रॅपर्सच्या स्पर्धेतून रंगवली भिंत, पोलिसांनी पकडताच तो म्हणू लागला ‘रॅप सॉंग’

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२२ । जळगाव शहरातील पोलीस अधिक्षकांच्या बंगल्या शेजारील भिंतीवर आक्षेपार्ह मजकूर लिहला असल्याचे वृत्त रविवारी जळगाव लाईव्ह न्यूजने प्रकाशित केले होते. पोलीस अधिक्षकांनी प्रकारची गंभीर दखल घेत तात्काळ पोलिसांना सूचना केल्या होत्या. पोलिसांनी बातमीच्या अवघ्या अर्ध्या तासात भिंतीवरील तो मजकूर हटविला आणि रामानंद नगर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा देखील दाखल केला होता. एलसीबीच्या पथकाने रविवारी रात्रीच भिंतीवर तो मजकूर लिहिणाऱ्या तरुणाचा शोध घेत त्याच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, पोलिसांनी अटक केल्यावर त्या तरुणाच्या तोंडून एक वेगळीच कहाणी समोर आली. Hip Hop DSP असे लिहिण्यामागील हेतू म्हणजे Hip Hop हा नृत्याचा प्रकार तर DSP म्हणजे ज्ञानेश सुरेश पाटील असे त्या तरुणाचे नाव असल्याची माहिती रॅपरने दिली.

जळगाव शहराचा विस्तार जसजसा वाढत आहे तशी विकृती देखील वाढत चालली आहे. कोण केव्हा कुठे काय कृती करेल याचा काही नेम राहिला नाही. काही दिवसांपूर्वीच एका माथेफिरूने चारचाकी, दुचाकी जाळल्याचा प्रकार घडला होता. कोणी मध्यरात्री भर चौकात फटाके फोडतो तर कुणी बुलेटच्या सायलेन्सरचा गन शॉट सारखा आवाज काढतो. जळगावातील तरुणाई व्यसनाधीन होत चालली असून नशेतच असे कृत्य घडतात. नुकतेच असाच एक प्रकार समोर आला असून दिल्ली, मुंबईत सहसा घडणारे हे प्रकार जळगावात आणि ते देखील पोलीस अधिक्षकांच्या घरा शेजारी घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

जिल्हा पोलीसदलाचे प्रमुख पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांचे निवासस्थान ‘अभय’ आहे. पोलीस अधिक्षकांच्या घराजवळच शहरातील सर्वात सुंदर आणि रात्रीच्या वेळी मोठी गजबज असलेला काव्य रत्नावली चौक आहे. पोलीस अधिक्षकांच्या निवासस्थानाला लागून एक मोकळी जागा असून त्याठिकाणी कांताई उद्यान प्रस्तावित आहे. रस्त्याच्या कडेला फूटपाथला लागून असलेल्या या भिंतीवर नेहमी काही ना काही उपक्रम राबविण्यात येतात किंवा संदेश लिहिले जातात. काही टारगटांनी भिंतीवर थेट व्यवस्थेचा निषेध करीत व्यवस्थेला शिवीगाळ करणारी पोस्ट लिहिली आहे. एकीकडे HipHop DSP असे तर दुसरीकडे ‘Fuck the System’ असे लिहीत टारगट तरुणांनी थेट व्यवस्थेलाच आव्हान दिले होते. मुख्य चौकात असलेल्या या भिंतीवरील मजकूर दिवसभर ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या नजरेस पडत होता. जळगाव लाईव्ह न्यूजने याबाबत रविवारी सकाळी वृत्त प्रकाशित केले होते.

पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ त्या टारगट तरुणाला शोधण्याच्या सूचना केल्या होत्या. रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी लागलीच त्या भिंतीवरील तो मजकूर दुसरा रंग मारत हटविला होता. तसेच याप्रकरणी पोलीस कर्मचारी रविंद्र चौधरी यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र राज्य मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम अंतर्गत अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपास सहाय्यक उपनिरीक्षक संजय चौधरी हे करीत होते. परिसरात सार्वजनिक सीसीटीव्ही कॅमेरे लांब होते तर समोर असलेली बँक बंद असल्याने तेथील सीसीटीव्ही फुटेज रविवारी मिळणे अवघड होते.

एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील विजय पाटील, प्रीतम पाटील, विजयसिंग पाटील, सचिन महाजन, राहुल पाटील यांना रविवारी रात्री गुप्त बातमीदारामार्फत भिंतीवर तो मजकूर लिहिणाऱ्याची माहिती मिळाली. पथकाने लागलीच खोटेनगर परिसरातून ज्ञानेश सुरेश पाटील या तरुणाला त्याच्या घरून ताब्यात घेतले. पथकाने त्याला घडलेल्या प्रकाराबाबत विचारणा केली असता त्याने सांगितलेली माहिती ऐकून हसावे कि त्याला झोडावे हेच पोलिसांना कळेनासे झाले. एका चांगल्या घरातील तो तरुण केवळ आपापसातील स्पर्धेमुळे काहीतरी करून बसला आणि स्वतःवर गुन्हा ओढवून घेतला असे त्याचे झाले.

पोलिसांनी अटक केलेला ज्ञानेश पाटील हा एक रॅपर असून तो आणि त्याचा गट रॅप सॉंग तयार करीत असतात. गेल्या काही दिवसापासून त्याच्या गटाची भुसावळच्या गटासोबत स्पर्धा सुरु असून ते एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न करीत आहे. भुसावळच्या गटाविरुद्ध ज्ञानेशच्या मनात प्रचंड चीड आहे. चार दिवसापूर्वी सकाळच्या सुमारास ज्ञानेशने त्या भिंतीवर काहीतरी लिहिण्याचे ठरविले. I LOVE JALGAON असे लिहिल्यावर Hip Hop DSP असे त्याने लिहले. DSP मागील त्याचा हेतू पोलीस अधीक्षक नव्हे तर स्वतःच्या ज्ञानेश सुरेश पाटील नावाचा शॉर्टफॉर्म होता. तसेच Fuck The System लिहिण्यामागील त्याचा हेतू भुसावळच्या रॅपर गटाची System पद्धत चुकीची आहे असे त्याला मांडायचे होते.

अंगात टी शर्ट, गळ्यात मोठी माळ, निळे केस असा अवतार असलेल्या ज्ञानेशला पकडल्यावर पोलिसांनी सर्व कल्पना दिली असता त्याने त्यावर देखील रॅप सॉंग तयार करायला सुरुवात केली. ‘अब मुझे पुलीसने पकडा, अब मैं जेल जाऊंगा’ असे काहीतरी जोडून तो गाणे तयार करीत असल्याने पोलिसांना देखील हसू आले. निव्वळ स्पर्धेतून केलेल्या खोडसारपणाची शिक्षा ज्ञानेशला भोगावी लागणार असून आजच्या घटनेतून धडा घेत भविष्यात तो नक्की काहीतरी चांगले कार्य करेल हे निश्चित.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.