जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२२ । जळगाव शहरातील जिल्हापेठ पोलिस ठाण्यात एका खुनाच्या गुन्ह्यात प्रदीप सोनू मेढे वय-५८ याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सर्वोच्च न्यायालयात अपील केल्यानंतर २००६ मध्ये तो जामिनावर सुटला होता. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा कायम केल्यानंतरही बंदी फरार आरोपी प्रदिप मेढे हा न्यायालयात हजर न झाल्याने त्याला अटक करण्याचे आदेश न्यायालयाने काढले होते. आरोपी १६ वर्षांनी जळगावातील घरी आल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाल्याने पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
जिल्हापेठ पोलीस स्टेशनला दाखल गु.र.नं.७५/१९९९ चे भादंवि कलम ३०२.१२० (ब), १४३, १४७, १४८, १४९, आर्म ऍक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्हयांत शिक्षा झालेल्या बंदी फरार आरोपी प्रदिप सोनु मेढे वय-५८ रा. वंजारी टेकडी, समतानगर, जळगाव यास जिल्हा व सत्र न्यायालय, जळगाव यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. बंदी फरार याने उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे अपील केली असता उच्च न्यायालय, खंडपीठ, औरंगाबाद यांनी सुध्दा शिक्षा कायम केली होती. त्यानंतर आरोपीतांनी सर्वोच्च न्यायालय, नवीदिल्ली येथे अपील दाखल केल्यानंतर बंदी फरार सन २००६ मध्ये अपील जामीनावर सुटलेला होता.
सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांनी सुध्दा गुन्हयांतील आरोपीतांची शिक्षा कायम केली आहे. त्यानंतर बंदी फरार प्रदीप मेढे हा न्यायालयात हजर झालेला नाही. तेव्हापासुन तो फरार असल्याने त्यास अटक करण्याबाबत उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबादकडील अन्वये बंदी फरार यास अटक करून न्यायालयात हजर करण्याबाबत आदेश झाले होते. त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना आरोपीताचे शोध घेण्याबाबत योग्य ते मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या.
प्रदीप मेढे हा सन २००६ पासुन फरार होता. त्याचे शोधकामी एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी त्यांचे पोलीस उप निरीक्षक अमोल देवढे, हवालदार सुनिल दामोदरे, अश्रफ शेख, पोना.नंदलाल पाटील, भगवान पाटील, प्रमोद लाडवंजारी, राजेंद्र पवार यांचे पथक तयार केले. दि.१७ जून २०२२ रोजी रात्री बंदी फरार प्रदिप सोनु मेढे हा समतानगर, जळगाव येथे आल्याची गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाल्याने पथकाने त्यास शिताफिने ताब्यात घेवून न्यायालयात हजर केले आहे.