जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२२ । वडीलोपार्जित शेतीच्या वाटणीवरुन एका कुटुंबात प्रचंड वाद सुरू झाले. त्यात भावाने सख्या भावाच्या डोक्यात कुऱ्हाड मारल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत धरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
मुश्ताक अब्दुल बासीद देशमुख (वय ४५, रा. पाळधी, ता. धरणगाव) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. देशमुख कुटुंबीयांची पाळधी शिवारात वडीलोपार्जित शेती आहे. शेतीच्या वाटणीवरुन भावांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होते. या वादाचा भडका ८ जून रोजी सकाळी आठ वाजता उडाला. या वेळी मुश्ताक यांच्या घरी त्यांचे भाऊ सलीम, आलीम, सोहेल, दानिश व जैम हे सर्वजण आले. वाटणीवरुन पुन्हा एकदा वाद सुरू झाले. या वादातून सर्वांनी मिळून मुश्ताक यांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. आलीम देशमुख याने थेट कुऱ्हाडीने डोक्यात वार करुन मुश्ताक यांना जखमी केले. जीवेठार मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या मुश्ताक यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. दोन दिवस उपचार केल्यानंतर ते शुद्धीवर आले. यानंतर त्यांनी पोलिसांना जबाब दिला. त्यानुसार हल्ला करणाऱ्या चौघांवर धरणगाव पाेलिस ठाण्यात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.