आजाराला कंटाळून कासोद्यात २२ वर्षीय तरुणाने संपविली जीवनयात्रा
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२२ । दीर्घ आजाराला कंटाळून कासोदा येथील साई पार्कमधील जयेश दगडू ठाकरे (वय २२) याने आत्महत्या केल्याची घटना १२ जून रोजी सकाळी ६ वाजेपूर्वी घडली. पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आई-वडिल नसल्याने जयेश ठाकरे याचा त्याचे काका पांडुरंग बाबुलाल ठाकरे हे सांभाळ करत होते. जयेश हा लहानपणापासून पांडुरंग ठाकरे यांच्यासोबत साई पार्क येथेच राहत होता. घरात पुढच्या खोलीत पांडुरंग ठाकरे व कुटुंबातील सदस्य झोपलेले असताना जयेश याने दीर्घ आजाराला कंटाळून १२ जून रोजी सकाळी ६ वाजेपूर्वी घराच्या मागील खोलीच्या छताच्या लोखंडी कडीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी उठल्यानंतर पांडुरंग ठाकरे यांच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर त्यांनी जयेश याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. परंतु, डाॅक्टरांनी तपासणी करुन जयेश याला मृत घोषित केले. याबाबत अजय संजय निकम यांच्या माहितीवरुन कासोदा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास सहा. पोलिस निरीक्षक नीता कायटे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार सहदेव घुले, पोलिस नाईक अमृत पाटील, कॉन्स्टेबल प्रवीण हटकर करत आहे. जयेश हा संतोष ठाकरे यांचा पुतण्या हाेता.