जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२२ । युक्रेन- रशिया युद्धाचा परिणाम सर्वच देशांवर झाला आहे. युद्धामुळे भारताच्या गव्हाला आखाती देशातून १५ ते २० लाख मेट्रिक टन गव्हाची निर्यात ऑर्डर मिळाली. त्याचा परिणाम भारतीय बाजारपेठेत गव्हाच्या भावात तब्बल ४५० रुपये प्रति क्विंटलमागे दरवाढ झाली हाेती. गेल्या पंधरवड्यात केंद्राने गव्हाच्या निर्यातीवर बंधन आणल्याने आठवडाभरातच जळगावच्या बाजारपेठेत गव्हाच्या किमती पुन्हा ३५० रुपयांची घसरण नाेंदवली गेली आहे.
आखाती देशांना लागणाऱ्या गव्हाचा माेठा निर्यात करणारा देश युक्रेन हाेता. युद्धामुळे युक्रेन गव्हाचा पुरवठा करू शकत नसल्याने भारतीय गव्हाला मागणी आली. अंतरराष्ट्रीय निर्यात कंपन्यांनी राजस्थान व मध्य प्रदेश या प्रमुख गहू उत्पादक राज्यातून लाखाे टन गव्हाची आगाऊ मागणी नाेंदवत जादा भावाने गव्हाची खरेदी केली. त्याचा परिणाम शेतकऱ्यांनी खासगी बाजारातच गव्हाची विक्री केल्याने शासकीय केंद्रांवर विक्रीसाठी गहूच विक्रीसाठी आला नाही. गव्हाचा शासकीय काेटादेखील पूर्ण न झाल्याने केंद्राने १५ ते २० दिवसांपूर्वी गव्हाच्या निर्यातीसाठी परवानगीची व निर्यात मर्यादेचे बंधन टाकले. त्यामुळे गहू निर्यातीत लक्षणीय घट हाेऊन देशांतर्गत गव्हाचे प्रमाण वाढीला लागले. त्याचा परिणाम म्हणून दर घसरले आहे.
दरवर्षी नवीन गहू येण्यापूर्वी गेल्या वर्षी असलेल्या गव्हाच्या दरात ५० ते ६० रुपयांची वाढ हाेते; परंतु यंदा आखाती देशांना गव्हाची माेठ्या प्रमाणावर निर्यात हाेत असल्याने गव्हाच्या दरात तब्बल ४५० रुपयांची प्रति क्विंटलमागे वाढ झाली. निर्यातीवर बंधन आल्यावर आठवडाभरातच गव्हाच्या दरात २५० रुपयांची घसरण झाली. मंगळवारी पुन्हा १०० रुपयांची घसरण झाल्याचे दाणाबाजार असाेसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारीया यांनी सांगितले. यंदा भाव वाढल्याने नेहमीच्या मागणीच्या ५० टक्केच मागणी अाल्याने वर्षभर गव्हाला मागणी असेल. अजूनही सधन शेतकऱ्यांनी भाववाढीच्या आशेने गहू बाजारात न आणता राखून ठेवला आहे. ताे बाजारात जादा भावानेच येईल, असे व्यावसायिक सांगतात.