⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

Accident : नियंत्रण सुटल्याने वाहन ३०० फूट खोल दरीत कोसळले

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२२ । कन्नड घाट उतरताना चाळीसगावकडून कन्नडकडे जाणाऱ्या बसमागून अचानक एक ट्रक ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात पिकअप वाहनासमोर आला. त्यामुळे पिकअप क्लिनर साइडला घेताना स्टेअरिंग अचानक फ्री झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटून पिकअप वाहन थेट ३०० फूट दरीत कोसळले. प्रसंगावधान राखून चालक, क्लिनरनी वाहनातून उड्या घेतल्याने ते बालंबाल बचावले. मात्र दरीत कोसळल्यामुळे पिकअपचा चक्काचूर झाल्याची घटना ८ जून राेजी कन्नड घाटात घडली.

शिरपूर येथील लखन शकील खाटीक (वय २७) हा त्याच्या मामाच्या महिंद्रा कंपनीच्या बोलोरो पिकअप (एमएच- १८, बीजी- ४४८१) वर चालक म्हणून काम करतो. ७ रोजी तो पिकअपमध्ये मेंढ्या घेऊन औरंगाबाद येथे गेला होता. ८ रोजी तो मेंढ्या सोडून रिकामी पिकअप घेऊन ताे शिरपूरकडे येत असताना सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास कन्नड घाटातील मेणबत्ती पॉईंट्च्या अलीकडे पाचव्या वळणावर चाळीसगावकडून कन्नडकडे जाणाऱ्या एसटी बसमागून एक ट्रक अचानक ओव्हरटेक करून पुढे घुसण्याच्या प्रयत्नात पिकअपसमोर आला. त्यामुळे भांबावलेल्या पिकअप चालकाने वाहन क्लिन्नर साईडला नेण्याच्या प्रयत्न केला. यात पिकअपचे स्टेअरींग अचानक फ्री झाल्याने गाडीवरील ताबा सुटला व पिकअपचे दोन्ही चाके क्लिन्नर साईडला रस्त्याच्या खाली दरीत घसरू लागले. त्याचवेळी खाली खोल दरी असल्याने चालक लखन खाटीक व क्लिन्नर रियाज गुलाब बागवान या दोघांनी जीव वाचवण्यासाठी पिकअपमधून उड्या घेतल्या. त्यांचे नशिब बलवत्तर म्हणून ते वाचले, मात्र पिकअप वाहन थेट ३०० फूट खोल दरीत कोसळून मोठे नुकसान झाले.

दरम्यान, गत वर्षी झालेल्या अतिवृष्टीत दरडी काेसल्या हाेत्या. गेल्या काही दिवसांपूर्वी घाटाची दुरुस्ती केली असली तरी अपघातांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.