जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२१ । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३० एप्रिल पर्यंत संचार बंदी लागू करण्यात आल्याने अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. असे असतांनाही शहरातील फुले मार्केट व केळकर मार्केटमधील व्यावसायिकांनी बाहेरून शटर बंद करून व्यवसाय करत असल्याचे आढळून आल्यानंतर ही पाचही दुकाने उपायुक्त संतोष वाहुळे यांनी सील केली आहेत. तसेच रस्त्यावर भाजीपाला विक्री करणाऱ्या आठ हातगाड्याही जप्त केल्या आहेत.
राज्यासह जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ३० एप्रिल पर्यंत संचार बंदी लागू करण्यात आला आहे. याकालावधीत अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. असे असतांनाही फुले मार्केट मधील दुकानादार आशीर्वाद कलेक्शन, गुड्डू कलेक्टशन, इंद्र कलेक्शन, समाधान कलेक्शन व गोवर्धन कलेक्शन हे व्यावसायिक ग्राहकांना दुकानात प्रवेश देऊन, आणि शटर बंद करून आत मध्ये व्यवसाय करत असल्याचे मनपाच्या अतिक्रमण पथकाच्या निदर्शनास आले. यावेळी उपायुक्त संतोष वाहुळे यांनी ग्राहकांना बाहेर काढून ही दुकाने सील केली. त्यानंतर भाजीपाला विक्रेतेही नेमलेल्या जागी व्यवसाय न करता रस्त्यात व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्याही हात गाड्याही जप्त करण्यात आल्या.
फुले मार्केट मध्ये चार व केळकर मार्केट मधील एक अशा चार दुकानांना शनिवारी फक्त सील करण्यात आले. सोमवारी या व्यावसायिकांना दंड ठोठावण्यात येणार असल्याची माहिती मनपातर्फे देण्यात आली. दरम्यान, या कारवाईमुळे व्यवसायिकांमध्ये एकाच खळबळ उडाली आहे.