जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जून २०२२ । राज्यभरात विधानपरिषद निवडणुकीची चाहूल लागली असून २० जून रोजी विधानपरिषदेची निवडणूक पार पडणार आहे. विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी सर्व पक्षाकडून चाचपणी सुरु आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून काही नावे निश्चित झाली असून माजी मंत्री एकनाथराव खडसेंना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. विधान परिषदेच्या निमित्ताने एकनाथराव खडसेंचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जाणार आहे. राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या यादीत त्यांच्या नावाचा प्रस्तावही होता. मात्र ही यादीच दीड वर्षांपासून प्रलंबित आहे. काल रात्री झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या जेष्ठ नेत्यांनी एकनाथराव खडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे समजते.
राज्याचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्यावर भोसरी येथील जमीन खरेदीप्रकरणी आरोप झाल्यानंतर त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. काही दिवसांनी खडसेंनी भाजपला रामराम करीत राष्ट्रवादी काँगेसची वाट धरली होती. खडसे राष्ट्रवादीत आल्याने त्यांचे लवकरच पुनर्वसन होईल अशा चर्चा तेव्हा रंगू लागल्या होत्या. महाविकास आघाडीने राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीत एकनाथराव खडसेंचे नाव देखील पाठविले होते. गेल्या दीड वर्षापासून महाविकासच्या आमदारांची यादी राज्यपालांकडे प्रलंबित आहे, त्यामुळे सर्व इच्छुकांच्या नियुक्त्या देखील रखडल्या आहेत. राज्यात त्या यादीमुळे राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी असे वातावरणच पाहायला मिळत आहे.
हे देखील वाचा : एकनाथ खडसेंवर होणारी कारवाई ‘आमच्यासाठी’ अयोग्य ! – खा. रक्षा खडसे
महाराष्ट्रात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी आणि राजकीय उलथापालथ जोरात सुरु आहे. राज्यसभेच्या रणधुमाळीतच विधान परिषद निवडणूक देखील येऊन ठेपली आहे. राज्यसभा निवडणूक १० जून रोजी पार पडल्यानंतर २० जून रोजी विधानसभा निवडणूक देखील पार पडणार आहे. विधानपरिषदेच्या उमेदवारीचे अर्ज भरण्याची अंतिम मुदत ९ जून आहे. त्यामुळे अर्ज भरायला आता केवळ दोनच दिवस शिल्लक आहेत. विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी २७ मतांची आवश्यकता आवश्यकता आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने सोमवारी बैठक झाली असून एकनाथराव खडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.