जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जून २०२२ । भुसावळ शहरातील रामदेव बाबा नगरातील रोहित दिलीप कोपरेकर (वय २१) या तरुणाचा खून करून शेतात मृतदेह फेकून देण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली होती. पोलिसांनी या प्रकरणी सुरूवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली असून शवविच्छेदन अहवाल हाती आल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेतली आहे. दरम्यान, खून प्रकरणी रोहितच्या संपर्कात असलेल्या दोघा मित्रांवर पोलिसांचा संशय असून त्यातीाल एकाला ठाण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. सोमवारी सकाळी जुना सातारा भागातील स्वच्छतागृहाजवळ मयत रोहितची दुचाकी आढळली असून ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी ती जप्त केली आहे.
30 मे रोजी रोहित घरी हॉटेलमध्ये कामाला जायचे असल्याचे सांगून दुचाकी (एम.एच.19 डी.पी.2423) ने बाहेर पडला होता. मात्र तीन दिवस उलटूनही घरी न परतल्याने तो हरवल्याबाबत 2 जून रोजी बाजारपेठ पोलिसात नोंद करण्यात आली होती तर रविवार, 5 रोजी वांजोळा शिवारातील मिरगव्हाण रस्त्यावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहामागे रोहितचा खून करून मृतदेह फेकण्यात आला होता. पाच दिवस उलटल्याने मृतदेहाच्या वरील भागाचा केवळ सांगडा शिल्लक राहिला होता मात्र चप्पल, पँट आदी वर्णनावरून मृतदेहाची पोलिसांनी ओळख पटवल्यानंतर घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आले व त्यात मृताच्या डोक्यात दगड टाकण्यात आल्याची बाब उघड झाली आहे मात्र अद्याप पोलिसांच्या हाती शवविच्छेदन अहवाल न आल्याने खुनाचा गुन्हा दाखल झालेला नाही. सोमवारी रात्री उशिरा वा मंगळवारी याबाबत खुनाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
मयत रोहितच्या संपर्कात असलेल्या मित्रांसह त्याच्या मोबाईलवर आलेल्या क्रमांकाच्या आधारावर पोलिसांकडून संशयीतांची चौकशी केली जात आहे तर काही संशयीताना ताब्यातही घेवून पोलिस सखोल चौकशी करीत आहेत. वैयक्तिक वादातून हत्या झाल्याबाबतही पोलिसांनी तपासाची दिशा पुढे सरकावली आहे तर सूत्रांच्या माहितीनुसार, दोन संशयीत पोलिसांच्या नजरेत असून त्यांनी हा खून केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे म्हणाले की, सर्वच बाजूंनी खुनाचा तपास सुरू असून शवविच्छेदन अहवाल हाती येताच खुनाचा गुन्हा दाखल होईल शिवाय आरोपी आमच्या नजरेत असलेतरी जो पर्यंत गुन्ह्याची उकल होत नाही तोपर्यंत अधिकृत काही सांगता येणार नाही.
जुना सातारा भागातील स्वच्छतागृहाजवळ पांढर्या रंगाची बेवारस दुचाकी असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी इंजिन व चेसीस क्रमांकावरून तपास केल्यानंतर ही दुचाकी (क्रमांक एम.एच.19 डी.पी.2423) मयत रोहितची असल्याचे स्पष्ट झाले तर मयताच्या कुटुंबियांनीही दुचाकीची ओळख पटवली आहे मात्र संशयीत आरोपींनी दुचाकीवर लिहिलेली महाकाल व आई ही नावे हटवली असलीतरी स्टीकरचा काही भाग तसाच राहिल्याने रोहितचीच ती दुचाकी असल्याचे स्पष्ट झाले आहे.