नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे सायकल दिनानिमित्त भव्य सायकल रॅली
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२२ । केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे शुक्रवार दि.३ रोजी जागतिक सायकल दिनानिमित्त जळगाव शहरात भव्य सायकल रॅली काढण्यात आली होती. सायकल रॅलीत सहभागी होत विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन आणि सदृढतेचा संदेश दिला. महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात झाली.
जगभरात दि.३ जून हा जागतिक सायकल दिन म्हणून साजरा केला जातो. केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे शहरात जिल्हास्तरीय सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीची सुरुवात महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. पर्यावरण संवर्धन काळाची गरज असून त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. दररोज वाहनांमधून निघणाऱ्या धूर आणि विषारी वायूमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने शक्य तेव्हा वाहनांचा वापर टाळून सायकलचा उपयोग करावा. सध्या इलेक्ट्रिक वाहनांना देखील शासन प्रोत्साहन देत असून आपण देखील त्यांचा वापर करायला हवा, असे आवाहन महापौर जयश्री महाजन यांनी केले आहे.
सकाळी ८ वाजता महापौरांनी हिरवी झेंडी दाखविल्यावर शासकीय आयटीआयपासून रॅलीला सुरुवात करण्यात आली. प्रसंग जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, शासकीय आयटीआयचे प्राचार्य ए.आर.चौधरी, राष्ट्रीय सेवा योजनेचे दीपक कोळी, नेहरू युवा केंद्राचे अजिंक्य गवळी आदी उपस्थित होते. शासकीय आयटीआयपासून रॅलीला सुरुवात झाल्यानंतर बहिणाबाई उद्यान, प्रभात चौक, आकाशवाणी चौक, स्वातंत्र्य चौक, नवीन बस स्थानकमार्गे कोर्ट चौकातून शिवतीर्थ मैदानावर शासकीय आयटीआयचे प्राचार्य ए.आर.चौधरी यांच्या प्रमुख रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी नेहरू युवा केंद्राचे अजिंक्य गवळी यांनी आभार मानले. सायकल रॅलीत सहभागी विद्यार्थ्यांना थंडपेय देण्यात आले. पर्यावरण बचाव, देश बचाव, सायकल चलाओ, ओझोन बचाओ अशी घोषणा यावेळी विद्यार्थ्यांनी दिल्या. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र वाटप केले जाणार आहे.
स्पर्धेसाठी नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक रोहन अवचारे, मनोज पाटील, राहुल जाधव, उमेश पाटील, हेतल पाटील, नेहा पवार, सुष्मिता भालेराव, कल्पना पाटील, चेतन वाणी यांनी परिश्रम घेतले. जळगाव शहरात काढण्यात आलेल्या रॅलीने सर्व नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. रॅलीसाठी जळगाव शहर वाहतूक शाखा, जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय, सायकलिस्ट ग्रुप, राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष सहकार्य लाभले. रॅलीत नेहरू युवा केंद्राशी संलग्नित युवा मंडळांचे अध्यक्ष आणि सदस्य देखील सहभागी झाले होते. दरम्यान, आठवडाभर प्रत्येक तालुक्यात देखील सायकल रॅलीचे आयोजन केले जाणार आहे.