जळगाव लाईव्ह न्युज | २४ मे २०२२ | महिलांच्या मागणीनुसार वाघनगर परिसरातील कानाकोपऱ्यात पाणी पोहाेचण्यासाठी १८.५ किलोमीटर लांबीची पाइपलाइन टाकण्यात येत असून, दोन महिन्यांत हे काम पूर्ण होणार असल्याची ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
वाघनगरातील पाणीपुरवठा योजनेत रेट्रोफिटिंगच्या अंतर्गत टाकण्यात येत असलेल्या जलवाहिनीच्या कामाचे भूमिपूजन केल्यानंतर ते बोलत होते. या जलवाहिन्यांमुळे वाघनगरात वाघूरचे शुद्ध पाणी पोहाेचणार असल्याने ग्रामपंचायत आणि परिसरातील नागरिकांनी पालकमंत्र्यांचा सत्कार केला. या परिसराचा झपाट्याने विस्तार होत असून, विकासकामांसाठी आपण येथील नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे पालकमंत्र्यांनी आवर्जून नमूद केले. गेल्या सुमारे १ वर्षापासून वाघनगरातील रहिवाशांना वाघूर धरणातील शुद्ध पाणी मिळत असले तरी पुरेशा पाइपलाइनच्या अभावी दूरवरच्या भागांमध्ये पाणी पोहाेचले नव्हते. या अनुषंगाने लोकांनी आणि खास करून महिलांनी मागणी केल्यामुळे पालकमंत्र्यांनी पाइपलाइनचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने रेट्रोफिटिंगच्या अंतर्गत वाघनगर पाणी पुरवठा योजनेसाठी १८.५ किलोमीटर लांबीच्या पाइपलाइनच्या कामांना मान्यता देण्यात आली. हे काम १ कोटी ९० लाख रुपयांचे असून, कंत्राटदार दुर्गादास पवार यांना २१ एप्रिलला कार्यादेश प्रदान करण्यात आला असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता एस.सी. निकम, नगरसेवक संतोष पाटील, सरपंच भगवान पाटील, दिलीप पाटील उपस्थित होते.
वाघनगर येथे १८.५ किमी लांबीच्या जलवाहिनीच्या कामाचे भूमिपूजन करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील.