जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२२ । वाराणसी स्थित ज्ञानवापी मशिदीमध्ये शिवलिंग मिळाल्याच्या दावा करण्यात आला होता. वाराणसी कोर्टाने ती जागा सील करण्याचे आदेश दिले आहेत. वाराणसी न्यायालयाने जिल्हा दंडाधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशानुसार, शिवलिंग प्राप्त झालेल्या जागेला तात्काळ सील करण्यात यावे व कोणत्याही व्यक्तीला तेथे जाऊ देऊ नये. त्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन आणि सीआरपीएफकडे देण्यात आली आहे.
कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार जिल्हा अधिकारी, पोलिस आयुक्त आणि सीआरपीएफ कमांडंट यांना वरील सर्व अधिकारी सील केलेल्या ठिकाणाच्या संरक्षणासाठी आणि सुरक्षेसाठी वैयक्तिकरित्या जबाबदार असतील.
वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षण संपले होते, पण शिवलिंग सापडल्याच्या दाव्यांवरुन आता वादळ उठले आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी सर्वेक्षणाचे काम पूर्ण करून टीम बाहेर पडताच हिंदू पक्षांनी शिवलिंग मिळाल्याचा दावा सुरू केला. हिंदूंच्या म्हणण्यानुसार, मशिदीच्या आवारातील विहिरीत 12.8 फूट व्यासाचे शिवलिंग सापडले आहे. तर मुस्लिम पक्षाने खंडन केले आहे. मुस्लिम बाजूचा दावा आहे की, आत काहीही सापडले नाही. दरम्यान, न्यायालयाचे आयुक्त अजय कुमार मिश्रा यांनी न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा हवाला देत शिवलिंग प्रकरणावर मौन पाळले आहे.