जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२२ । दोन दिवसापूर्वी दूध संघात घडलेला प्रकार चुकीचा आहे. या प्रकाराबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, दूध संघाच्या व्यवस्थापकीय संचालकांशी बोललो. या प्रकरणात लक्ष घालण्याचे त्यांना सांगितले आहे. आमचे संघटनात्मक नियोजन योग्य आहे. केव्हाही निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी आहे. पावसाळा तोंडावर असल्याने या निवडणूक सप्टेंबरनंतर होतील असा माझा अंदाज आहे. ज्याठिकाणी ओबीसी जागा आहे त्याठिकाणी ओबीसीच उमेदवार देणार आहोत. खुल्या प्रवर्गातील व्यक्ती देणार नाही. ज्याठिकाणी ओबीसीचा प्रवर्ग खुला झालेला आहे त्याठिकाणी ओबीसी उमेदवारच देणार असल्याचे माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांनी सांगितले.
संपूर्ण भारताने भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांना सर्टिफिकेट दिले आहे. तुम्हाला मोदींवर बोलण्याचा अधिकार आहे का? तुमची कुवत आहे का? तुम्ही गटारीतले बेडूक आहात. अशा शब्दात माझी जलसंपदामंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे आमदार गिरीश महाजन यांनी शिवसेनेवर टीका केली. शिवसेनेने सुरू केलेल्या शिवसंपर्क अभियानांतर्गत मुख्यमंत्री ठाकरे यांनी शनिवारी मुंबईत शिवसेनेची भव्य अशी सभा घेतली होती. या सभेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी हिंदुत्व केंद्रीय यंत्रणा यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना धुळ्यामध्ये गिरीश महाजन यांनी शिवसेनेवर टीका केली.
धुळे येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर रविवारी दुपारी आ.गिरीश महाजन हे जळगावात आले होते. जी.एम.फाऊंडेशनच्या कार्यालयात आ.महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. औरंगाबादमध्ये झालेला प्रकार महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारा प्रकार आहे. औरंगजेब आमच्या शिवरायांचा सर्वात मोठा शत्रू होता. काही लोकांचा जातीयपुर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. राजकारणाच्या माध्यमातून हे करण्याचा प्रयत्न आहे, त्याचे काय परिणाम होतील याची चिंता कुणालाच नाही. जे झाले ते होऊन गेले आहे, ते व्हायलाच नको होते. आम्ही भारतीय जनता पक्षातर्फे त्याचा निषेध करीत असल्याचे आ.महाजन यांनी सांगितले.