जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२२ । मागील दोन दिवसापासून जळगाव जिल्ह्यातील तापमानाचा पारा घसरताना दिसून आला. अंदमान-निकोबार बेट समूहावर नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) दाखल झाले असून त्यात ढगाळ वातावरणामुळे ४५ ते ४६ अंशावर जाणारा पारा आता ४२ ते ४३ आला आहे. दरम्यान, मोसमी वारे वाहू लागल्याने दिवसासह रात्रीच्या वेळेस उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळत आहे. आज शनिवारी दुपारी १ वाजेपर्यंत तापमानाचा पारा ४० अंशाच्या खाली दिसून येत आहे.
दोन ते तीन आठवड्यामधील काही दिवस जिल्ह्यातील तापमानाचा पारा राज्यातील सर्वाधिक नोंदविला गेला होता. जिल्ह्यातील भुसावळ मध्ये यंदाचा सार्वधिक पारा ४७.८ अंशावर गेला होता. तर जळगावचा पारा ४५ अंशावर गेला होता. यामुळे सकाळीच १० वाजेपासून उन्हाचा पारा हा ४० अंशावर जात असल्याने प्रचंड उष्णता वाढली होती. त्यामुळे सकाळपासूनच असह्य उकाडा जाणवत होता.
मात्र, गेल्या दोन दिवसापासून तापमानाचा पारा २ ते ३ अंशाने घसरला आहे. तसेच मोसमी वारे वाहू लागण्याने वातावरणात काहीसा दिवसा उष्णता काहीशी कमी झाली आहे. तसेच रात्रीच्या वेळेस जोरदार वारे वाहत असल्याने वातावरणात थंडावा जाणवत आहे.
दरम्यान, देशात २७ मे राेजी म्हणजे चार दिवस अगोदर मान्सूनचा प्रवेश हाेणार असल्याचे हवामानतज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी स्पष्ट केले आहे. खासगी संस्था स्कायमेटनेही २६ मे रोजी मान्सून भारतीय भूभागावर पोहोचू शकतो, असे म्हटले आहे. दरवर्षी मान्सून २१ मेपर्यंत अंदमानात, तर १ जूनपर्यंत केरळात येतो. यंदा १५ मे रोजीच ताे अंदमान समुद्रात पाेहाेचण्याची शक्यता आहे.
जळगावातील आजचे दिवसभरातील तापमान (Jalgaon Temperature) असे?
वेळ – अंश
१२ वाजेला – ३७ अंश
१ वाजेला- ३८ अंशापुढे
२ वाजेला –४० अंश
३ वाजेला – ४२अंशापुढे
४ वाजेला – ४२ अंश
५ वाजेला – ४२ अंश
६ वाजेला – ४१अंश
७ वाजेला – ३९ अंश
आणि रात्री ८ वाजेला ३८ तर रात्री ९ वाजेला ३७ अंशावर स्थिरावणार.