जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२१ । मागील दोन दिवसांपासून शहराचे तापमान ४२ अंशांवर वाढल्याने सकाळपासून उन्हाच्या तीव्र झळांनी तसेच उकाड्याने जळगावकर चांगलेच हैराण झाले. मात्र, आज बुधवारी जळगाव शहरासह परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून बऱ्यापैकी दिलासा मिळाला.
जिल्ह्यात रात्री काही ठिकाणी पावसाच्या तुरळीक सरी कोसळल्यानंतर आज बुधवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. एकीकडे तापमान वाढत असताना उकाड्याने जळगावकर हैराण झाले आहेत, तर दुसरीकडे आणखी दोन दिवस संपूर्ण उत्तर महाराष्ट्रावर वादळ आणि अवकाळी पावसाचे सावट कायम राहणार असल्याचा अंदाज पुण्यातील भारत माैसम विभागाने वर्तवला आहे.
पुढील आठवड्यात सोमवारपासून ग्रीष्म ऋतूला प्रारंभ होत असून, सुरुवातीच्या चार दिवसांतच अवकाळीचा फेरा पुन्हा येण्याचा अंदाज आहे. बहुतांश ठिकाणी गहू, हरभरा काढणीचे काम शेतकऱ्यांनी पूर्ण केले आहे. तर काही ठिकाणी सुरू आहे. बाजरी, ज्वारीही काढण्यात आली आहे. मक्याची काढणी मात्र बाकी आहे. त्यातच जिल्ह्यात ढगाळ वातावरण होत असल्याने शेतकरी चिंतीत झाले आहे.
दरम्यान, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढच्या दोन दिवसांमध्ये विजेच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सांयकाळी आणि रात्रीच्या वेळी पाऊस विजांच्या कडकडाटासह हजेरी लावण्याची शक्यता आहे.