SP Jalgaon : जिल्ह्यात ६०८ मस्जिद, ३७० मंदिरांना लाऊडस्पीकरची परवानगी, इतरांना दोन दिवसांचा अल्टीमेटम

मे 5, 2022 5:48 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२२ । धार्मिक स्थळांवर भोंगे आणि लाऊडस्पीकर (Loudspeaker) लावण्याबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांची जळगाव जिल्ह्यात अंमलबजावणी केली जाणार आहे. आजवर पोलिसांकडे भोंगे किंवा लाऊडस्पीकर लावण्यासाठी अर्ज केलेल्या ६०८ मस्जिद आणि ३७० मंदिरांना अटी, शर्थीच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे (SP Pravin Munde) यांनी दिली आहे.

Loudspeaker sp pravin munde jpg webp

धार्मिक स्थळांवरील भोंग्याबाबत राज्य सरकारने पाऊले टाकली असून पोलीस प्रशासन कामाला लागले आहे. जळगाव जिल्ह्यातील धार्मिक स्थळांची माहिती देण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. प्रसंगी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले उपस्थित होते. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटविण्याचा मुद्दा हाती घेतल्यानंतर राज्यातील सामाजिक आणि धार्मिक वातावरण बिघडले होते. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या आवाजाच्या मर्यादेबाबत तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस प्रशासन कामाला लागले होते.

पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सांगितले, पोलीस प्रशासनाकडे उपलब्ध माहितीनुसार जिल्ह्यात ६६३ मस्जिद असून त्यापैकी ६०८ मस्जिदींना परवानगी देण्यात आली आहे. ११ मस्जिदींवर भोंगे लावले नसल्याचे ट्रस्टने कळविले आहे. तसेच ४४ मस्जिदींना परवानगी देण्याचे काम अद्याप बाकी असून येत्या दोन दिवसात ते पूर्ण केले जाणार आहे. जिल्ह्यात २८१९ मंदिरे असल्याची पोलिसांकडे माहिती असून त्यापैकी अर्ज केलेल्या ३७० मंदिरांना लाऊडस्पीकर वाजविण्याची परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यात जो मागेल त्यांना अटी, शर्थीच्या अधीन राहून परवानगी देण्याचे धोरण जिल्हा पोलीस प्रशासनाचे आहे. कुणी विना परवानगी असल्यास त्यांना मुभा दिली जाणार नाही. जर कुणी आढळून आले तर पोलीस कठोर कारवाई करणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now