जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२१ । मागील काही दिवसांपासून जळगाव शहराच्या तापमानात वाढ होत आहे. विशेष म्हणजे एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जळगाव शहराचे तापमान चाळीशी पार गेले आहे. मागील दोन दिवसांपासून शहराचे तापमान ४२ अंशांवर आहे.
दरम्यान, एकीकडे तापमान वाढत असताना उकाड्याने जळगावकर हैराण झाले आहेत, तर दुसरीकडे आणखी दोन दिवस संपूर्ण उत्तर महाराष्ट्रावर वादळ आणि अवकाळी पावसाचे सावट कायम राहणार असल्याचा अंदाज पुण्यातील भारत माैसम विभागाने वर्तवला आहे. पुढील आठवड्यात सोमवारपासून ग्रीष्म ऋतूला प्रारंभ होत असून, सुरुवातीच्या चार दिवसांतच अवकाळीचा फेरा पुन्हा येण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार या आठवड्यात राज्यभर तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस, गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला होता. आता उत्तर-दक्षिण निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा विरल्याचे चित्र आहे.