⁠ 
शुक्रवार, डिसेंबर 13, 2024
Home | विशेष | Special Article : दोघांच्या पुढाकाराने जपल्या गेल्या बालकवींच्या स्मृती, तत्कालीन रेल्वेमंत्र्यांनी घातले होते लक्ष

Special Article : दोघांच्या पुढाकाराने जपल्या गेल्या बालकवींच्या स्मृती, तत्कालीन रेल्वेमंत्र्यांनी घातले होते लक्ष

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२२ । लहानपणापासून आपण दरवर्षी ‘श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे’ या कवितांच्या ओळी ओठांवर आणतो आणि गुणगुणतो असे कवी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हणजेच बालकवी. वयाच्या तिशीचा उंबरा ओलांडण्यापूर्वीच बालकवी ठोंबरेंनी मराठी साहित्यात आपला ठसा उमटवला. ५ मे १९१८ रोजी जळगाव ते भुसावळ दरम्यान भादली स्टेशनलगत रेल्वे अपघातात त्यांचे निधन झाले. बालकवींच्या स्मरणार्थ भादली येथे उभारण्यात आलेले लहानसे स्मारक काळाच्या ओघात हरवले. जळगावकरांना देखील त्याचा विसर पडला. रेल्वे रुळाच्या विस्तारीकरणात ते स्मारक देखील हटविले जाणार होते. बालकवींच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी जेष्ठ संपादक सुधीर जोगळेकर आणिजैन उद्योग समूहातील सहकारी किशोर कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला. थेट तत्कालीन रेल्वे मंत्र्यांशी पत्रव्यवहार करून स्मारकाबाबत अवगत केले. रेल्वे मंत्रालयाने देखील सकारात्मक प्रतिसाद दिल्याने नूतन स्मारक उभारण्यात आले आहे.

बालकवी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे मूळचे धरणगावचे. जळगाव जिल्ह्याला लाभलेल्या थोर साहित्यिकांपैकी एक होते ते बालकवी ठोंबरे. जळगाव भुसावळ दरम्यान भादली रेल्वेस्थानकाजवळ एका अपघातात बालकवींचे निधन झाले होते. बालकवींच्या स्मरणार्थ भादली रेल्वे स्थानकालगत एक लहानसे स्मारक देखील उभारण्यात आले होते. काळाच्या ओघात जळगावकरांना बालकवी तर लक्षात राहिले परंतु त्यांचे स्मारक मात्र विस्मरणात गेले. स्मारक उभारणीचा किस्सा देखील निराळा आहे. १९९० मध्ये रेल्वे प्रशासनाने बालकवींची पुण्यतिथी साजरी केली तेव्हा बालकवींच्या स्मारकाचे निर्माण करण्यात आले. तब्बल ७२ वर्षानंतर मराठी साहित्यिक बालकवींना रेल्वे प्रशासनाने न्याय दिला.

कॉफीटेबल बुकचे निमित्त अन् निर्माण झाले नवीन स्मृतीस्थळ

दै.लोकसत्ताचे माजी संपादक सुधीर जोगळेकर हे मराठी साहित्य सांस्कृति मंडळाचे सदस्य होते. बालकवींच्या या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त त्यांना कॉफीटेबल बुक निर्माण करायचे असल्याने त्या कामी ते जळगाव येथे होते. जैन उद्योग समूहाच्या प्रसिद्धी विभागातील सहकारी किशोर कुलकर्णी यांच्यासोबत त्यांनी भादलीच्या बालकवींच्या स्मृतिस्थळाला २८ फेब्रुवारी २०१७ रोजी भेट दिली. मराठी माणसाला सुंदर कविता देणाऱ्या बालकवींची रेल्वेला आठवण राहिली मात्र मराठी माणसालाच सोयीस्कर विसर पडला हे त्यांना प्रकर्षाने जाणवले. या महान कवीबद्दल इतकी अनस्था पाहून दोघांना प्रचंड वाईट वाटले. स्मृतिस्थळावर गेल्यावर त्यांना कळले की हे स्मृतिस्थळ देखील यावर्षी रेल्वे रूळ विस्तारीकरणासाठी हलविले जात आहे. बालकवींच्या स्मृती जपण्यासाठी सुधीर जोगळेकर यांनी थेट आपल्या मंत्रालयात व अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधला. तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना सर्व प्रकार लक्षात आणून देण्यात आला. विषयाचे गांभीर्य ओळखून रेल्वे मंत्रालयाने बालकवींचे स्मृतीस्थळ संरक्षीत करून चांगले स्मृतिस्थळ उभारण्याचे आदेश दिले.

रेल्वेमंत्र्यांचे मानले आभार

रेल्वे प्रशासनाने दोन वेळा बालकवी ठोंबरेंच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न केला. मराठी माणसाला आणि विशेषतः जळगावकरांना विसर पडला आहे. रेल्वे प्रशासनाने पुढाकार घेत बालकवींच्या स्मृतींना उजाळा दिल्याने किशोर कुलकर्णी यांनी रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहून आभार मानले. भादली येथे बालकवींचे स्मारक असून त्यावर कवितेच्या ओळी आणि माहिती असलेली कोनशिला लावण्यात आली आहे.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.