जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मे २०२२ । मेहरूण येथील साई मंदिराच्या प्रांगणात विकास कामे झाली, याबाबत समाधान आहे. जनतेच्या भल्यासाठी यापुढेही आमदार निधी उपलब्ध करून देऊ, असे प्रतिपादन शहराचे आ. राजूमामा भोळे यांनी केले.
मेहरूण येथील प्रभाग क्रमांक १५ मध्ये गावठाण भागातील मनपाच्या खुल्या जागेत पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले. या कामासाठी आ. राजूमामा भोळे यांनी आमदार निधीतून २० लाख रुपये दिले होते. या कामाचा शुभारंभ मंगळवारी ३ मे रोजी आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर जयश्री महाजन, विरोधी पक्षनेते डॉ. सुनील महाजन, उद्योजक चंद्रकांत लाडवंजारी यांच्यासह कामाचे शिल्पकार नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य प्रशांत नाईक उपस्थित होते. यावेळी आ. राजूमामा भोळे यांनी विकासनिधी दिल्याबद्दल ग्रामस्थांतर्फे प्रशांत नाईक यांनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी आ. राजूमामा भोळे म्हणाले की, जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. नागरिकांच्या सोयीसुविधांच्या दृष्टीने विकासकामांचे नियोजन व निधीसाठी पाठपुरावा नियमित केला जात असतो. नागरिकांसाठी पेव्हर ब्लॉक बसविल्याने परिसरातील वातावरण आल्हाददायी झाले आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या शोभा चौधरी, मक्तेदार गौरव पाटील, बंडू वाणी यांच्यासह मेहरूणचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.