जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२२ । देशभरात सध्या इलेक्ट्रॉनिक बाईक विक्रीला प्राधान्य दिले जात असतानाच काही दिवसात ई बाईकला आग लागण्याच्या घटना समोर आल्या होत्या. दरम्यान, दोन दिवसापासून मीडियात एक बातमी व्हायरल होत असून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ट्विट करीत ई बाईकचे उत्पादन थांबविण्याचे आदेश दिले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी असे सांगितले जात असले तरी ते सर्व खोटे आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ट्विट करून याचा खुलासा केला असून तसा कोणताही प्रकार आणि आदेश नसल्याचे स्पष्ट केले आहे.
राज्यात आणि देशात उन्हाचा तडाखा जोरदार सुरु आहे. सर्वत्र सूर्यदेव कोपले असून देशात अनेक जिल्ह्यातील पारा ४५ पार पोहचला आहे. नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. एकीकडे ऊन वाढत असले तर दुसरीकडे मात्र इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या विक्रीत देखील मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून देखील प्रदूषण टाळण्यासाठी ई बाईक्सच्या विक्रीला प्राधान्य दिले जात आहे. अर्थसंकल्पात देखील त्यासाठी तरतूद करण्यात आली आहे.
ई बाईक्सला आग लागण्याच्या, बॅटरीचा स्फोट होण्याच्या घटना काही दिवसापासून समोर येऊ लागल्या आहेत. देशातील या वाढत्या घटना विचार करण्यासारख्या असून आगीच्या घटनांची चौकशी केल्याशिवाय कोणतेही नवीन मॉडेल लॉन्च करण्यात येऊ नये अशा सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिल्या आहेत. तसेच कोणत्याही इलेक्ट्रिक वाहन उत्पादकाने उत्पादन करू नये असे निर्देश दिल्याचे वृत्त गुरुवारपासून माध्यमातून झळकत आहे. MORTHINDIA ने ट्विट करून तशी माहिती दिल्याचे सांगितले जात होते.
दरम्यान, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ट्विट करून हे सर्व खोडून काढले आहे. ई बाईक्सच्या विक्री आणि उत्पादन बाबत शासनाने कोणतेही निर्देश दिलेले नसून माध्यमातून झळकणारे आणि सोशल मीडियात फिरणारे वृत्त निराधार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी इलेक्ट्रॉनिक वाहन निर्मात्या कंपन्यांना इशारा देत, जर कोणतीही कंपनी निर्मिती प्रक्रियेत निष्काळजीपणा करीत असेल तर त्याववर कारवाई करीत मोठा दंड आकाराला जाईल आणि सर्व सदोष वाहने परत बोलाविण्याचे आदेश दिले जातील असे त्यांनी म्हटले होते.
देशभरात ई बाईकच्या गेल्या काही महिन्यात तब्बल २६ वाहनांना आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून त्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे. ना.नितीन गडकरी यांनी आगीच्या घटनांच्या चौकशीकामी समिती स्थापन केली आहे. समितीच्या अहवालानंतर सरकार इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या गुणवत्तेबाबत मार्गदर्शक तत्वे जारी करणार आहे. तूर्तास तरी केंद्राकडून वाहनांची निर्मिती किंवा विक्री थांबविण्याबाबत कोणतेही आदेश किंवा निर्देश नसल्याचे दिसून येते.