जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२१ । जळगाव शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, कोरोनामुळे व कोरोनासदृश आजारामुळे शहरात दिवसाला अनेक मृत्यू होत आहेत. यामुळे शहरातील नेरी नाका स्मशानभूमीत मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा शिल्लक राहत नसल्याने, अनेकांना खाली अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. ही परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत जात असल्याने, या स्मशानभूमीत लोकसहभागातून महापौर जयश्री महाजन यांनी ७ ओटे तयार करून घेतले आहे. रविवारी चर्चा केल्यानंतर सोमवारी तातडीने महापौरांनी स्वतः उभे राहून बांधकाम करून घेतले. उर्वरित ५ ओटे देखील लवकरच मेहरूणच्या स्मशानभूमीत तयार केले जाणार आहे.
शहरात कोरोना, कोरोना सदृश्य आजार व इतर आजारांनी मृत होणाऱ्या ३० हून अधिक मृतदेहांवर नेरी नाका स्मशानभूमीत दिवसाला अंत्यसंस्कार केले जात आहेत. या स्मशानभूमीत एकूण आठ ओटे आणि गॅसदाहिनी असून मृतदेहांची संख्या वाढल्याने ते कमी पडू लागले आहे. शहरातील अनेक नागरिकांना ओट्यांसाठी तासभर वाट पहावी लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नेरीनाका स्मशानभूमीत आणखी ओटे तयार करावे म्हणून महापौर जयश्री महाजन यांनी काही समाजसेवी संस्था आणि व्यक्तींशी संपर्क साधला. महापौरांच्या विनंतीला मान देत श्रीराम खटोड, खुबचंद साहित्या यांनी १२ ओटे तयार करून देण्याचे सांगितले होते. महापौर जयश्री महाजन यांनी सोमवारी स्वतः सायंकाळी स्मशानभूमीत उभे राहून ७ ओट्यांचे बांधकाम पूर्ण करून घेतले. यावेळी नगरसेवक सुनील महाजन, सुरेश तलरेजा, खुबचंद साहित्या आदी उपस्थित होते. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नव्याने तयार केलेले ओटे काही दिवसात उपलब्ध होणार असून त्यामुळे नागरिकांची गैरसोय टळणार आहे. मेहरूण परिसरातील स्मशानभूमीत ५ ओटे लवकरच तयार केले जाणार असून शिवाजीनगर व पिंप्राळा स्मशानभूमीत देखील श्रीराम खटोड आणि खुबचंद साहित्या हे ओटे तयार करून देणार आहेत.
जळगाव शहरातील इतर स्मशानभूमीत इतर सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी सेवाभावी संस्था आणि समाजसेवकांनी पुढे यावे असे आवाहन महापौर जयश्री महाजन यांनी केले आहे.