.जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२२ । महापालिकेच्या प्रभाग समिती सभापती निवडीसाठी दि.२० रोजी पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निवडीसाठी ४ स्वतंत्र विशेष महासभांचे आयोजन करण्यात आले होते. एका पाठोपाठ एका प्रभाग समिती सभापतीची निवड करण्यात आली. या सर्वात महत्वाची बाब म्हणजे निवडणुकीत उमेदवारांसह १८ नगरसेवकांनी हजेरी लावली तर तब्बल ५७ नगरसेवकांनी निवड सभेला गैरहजर होते.
.
महापालिकेच्या चारही प्रभाग समिती सभापतींची निवड जाहीर झालेली होती. दि.२० रोजी विशेष महासभेत प्रभाग समिती सभापतींची निवड घोषीत करण्यात आली. यापुर्वीच सभापती पदाच्या चारही उमेदवारांच्या नावावर शिक्का मोर्तब झाला होता. त्यामुळे फक्त औपचारिक्ता बाकी होती. शिवसेना, भाजप व एमआयएम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांची चर्चा करुन निवडणुक बिन विरोध करण्याचे ठरविले होते. त्यानुसार प्रत्येक प्रभाग समिती सभापती पदासाठी एकमेव अर्ज दाखल करण्यात आले होते.बुधवारी सकाळी ११ वाजता पहिल्या महासभेला सुरुवात झाली. सुरवातीला जिल्हाधिकाऱ्यांनी अर्ज छाननी करुन उमेदवाराला माघारीसाठी १५ मिनिटांचा वेळ दिला होता. त्यानुसार १५ मिनिटे वाट पाहून उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्यामुळे प्रभाग समिती क्रमांकचे उमेदवार रुक्सानाबी गबलू खान (बंडखोर गट) यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. याच पध्दतीने प्रभाग समिती क्रमांक २ मधून मुकुंदा भागवत सोनवणे (भाजप), प्रभाग समिती क्रमांक ३ मधून सुन्नाबी राजू देशमुख(एमआयएम), व प्रभाग समिती ४ मधून पार्वताबाई दामु भिल(बंडखोर गट) यांची निवड करण्यात आली आहे.