अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्यावर जिल्हापेठ पोलिसांची कारवाई
जळगाव – शिव कॉलनी येथील राष्ट्रीय महामार्गावरून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टरवर कारवाई करत चालकाला ताब्यात घेतले आहे. याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
जिल्हापेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिव कॉलनी येथील राष्ट्रीय महामार्गावरून बेकायदेशीर वाळूची वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलिसांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक जुबेर तडवी यांनी गुरुवार १४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता वाळू वाहतूक करणाऱ्या (ट्रॅक्टर एमएच ३९ सीएच ५१६) आणि विना क्रमांकाची ट्रॉलीला थांबविले. टॉलीमध्ये वाळू असल्याने चालक राम पितांबर सोनवणे (वय-२८) रा. पाळधी ता. धरणगाव याला वाळू वाहतुकीची परवानगी किंवा पावतीची विचारणा केली. परंतु चालकाकडे कोणतीही पावती मिळून न आल्याने पोलिसांनी ट्रॅक्टर जप्त केले. तर चालक राम सोनवणे याला ताब्यात घेतले. दुपारी १.३० वाजता पोलीस नाईक जुबेर तडवी यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक राम पितांबर सोनवणे रा. पारधी ता.धरणगाव याच्याविरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्र बागुल करीत आहे.