जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२१ । जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता कामाबाबत पत्रव्यवहार करीत असल्याने त्यांना मक्तेदाराकडून धमकवण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मक्तेदार एका माजी ‘बड्या’ अधिकाऱ्याचा नातेवाईक असल्याचे समजते. अभियंता आढे यांनी याबाबत आपल्या वरिष्ठांना देखील कळविले असल्याची माहिती त्यांनी ‘जळगाव लाईव्ह न्यूज’शी बोलताना दिली आहे.
यावल तालुक्यातील हरिपुरा बृहत लघुपाटबंधारे तलावचे काम लघु पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता नितीनकुमार तुकाराम आढे हे पाहत आहे. तलावाच्या कामाबाबत त्यांनी वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केला आहे. दि.५ रोजी सायंकाळी ५ वाजून १२ मिनिटांनी मक्तेदार महेंद्र पाटील यांनी आढे यांना फोन करून माझ्या हरिपुरा येथील साईटवर पाय ठेवू नका, तुमची बदली करून घ्या अशी धमकी दिली. धमकीमुळे मानसिक स्थिती खराब झाली असून मी माझ्या जिवाचे काही बरेवाईट केल्यास त्यास महेंद्र पाटील यांना जबाबदार धरावे असा अर्ज आढे यांनी ल.पा.च्या उपविभागीय अभियंता यांना दि.५ रोजीच दिला आहे.
दुसऱ्याच दिवशी पुन्हा धमकी
दि.६ रोजी दुपारी ५ वाजून १० मिनिटांनी त्यांना मक्तेदार महेंद्र मुरलीधर पाटील, चक्रधर कॉन्ट्रॅक्टर अँड इंजिनिअर, हिरा पन्ना अपार्टमेंट, जळगाव यांनी फोन करून धमकावले. साईटवर पाय ठेऊ नका आणि काम होत नसेल तर बदली करून घ्या अशी धमकी दिली. आढे यांनी रामानंद नगर पोलिसात याबाबत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. आढे यांनी याबाबत वरिष्ठांना देखील कळविले आहे. आढे यांच्या तक्रारीची दखल न घेतल्यास किंवा पुन्हा काही दबाव आणल्यास ते न्यायालयात देखील दाद मागणार असल्याचे नितीनकुमार आढे यांनी जळगाव लाईव्ह न्यूजशी बोलताना सांगितले.
अभियंत्यांना कठोर कारवाईची अपेक्षा
महेंद्र पाटील यांचे नातेवाईक राज्याचे माजी अधिकारी असून त्यांचे सर्वच आजी-माजी लोकप्रतिनिधींशी चांगले संबंध आहे. महेंद्र पाटील यांनी दबाब आणण्याचा प्रयत्न केल्याने अभियंत्यांचा संयम व सहनशक्ती संपल्यामुळे तसेच त्यांनी खात्यातील वरिष्ठांकडे या बाबीची तक्रार केली. पोलिसांनी आणि लघु पाटबंधारे विभागाने तक्रारीची योग्य ती दखल घेणे आवश्यक आहे. वरिष्ठ अधिकारी व त्यांच्यामुळे होणाऱ्या त्रासाने सौ.चव्हाण यांनी अमरावती येथे आत्महत्या केली.
तसेच जळगाव येथे महाराष्ट्र राज्य विद्युत विभागाच्या अधीक्षक अभियंता श्री.खान यांना चाळीसगावचे आ.मंगेश चव्हाण यांनी अशाच प्रकारे धमकी व खुर्चीला बांधले असता पोलिसांनी त्यांना अटक करून कायदेशीर कारवाई केलेली आहे. त्याच धर्तीवर पोलीस आणि पाटबंधारे विभागाने व्यवस्थितपणे व निर्भयतेने चौकशी करून महेंद्र पाटील यांच्यावर आवश्यक व योग्य कारवाई करावी अशी अपेक्षा सर्व अभियंत्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे.