जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२२ । भाजपने काल मोर्चा काढला, त्यात त्या खासदाराने इथे बोंबलण्यापेक्षा दिल्लीत जर बोंबलले असते तर त्यांचा जाहीर सत्कार झाला असता. जखम डोक्याला आणि मलम मांडीला अशी बोलण्याची त्यांची तत्परता चुकीची आहे. माझ्यावर टीका केल्याशिवाय खासदार मोठे होऊच शकत नाही. अरे हा पट्ठ्या राहिला नसता तर तू निवडूनच आला नसता अशी टीका पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी केली.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जळगाव रेल्वेस्थानक बाहेर बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खा.उन्मेष पाटील विरुद्ध पालकमंत्री गुलाबराब पाटील यांच्यातील शाब्दिक युद्ध पुन्हा एकदा सुरु झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही नेते एकमेकांवर एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही.
ना.गुलाबराव पाटील म्हणाले कि, भारनियमन होते आहे. त्यामुळे शेतकरी, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. अनेकांना त्याचा मोठा फटका बसतो आहे. कोळसा केंद्राकडून मिळत नसल्याने हि परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्राने आपल्याला कोळसा द्यावा. केंद्रात बसलेल्या महाराष्ट्रातील मंत्र्यांनी मोदी साहेबांना कोळसाबाबत आठवण करून द्यावी, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
पहा व्हिडीओ काय म्हणाले ना.गुलाबराव पाटील :