जळगाव लाईव्ह न्यूज । १२ एप्रिल २०२२ । अमळनेर येथील ताडेपूरा भागात आठ महिन्यांपूर्वी घरफोडी करून आठ लाख रुपयांचे दागिने व रोख रक्कम लंपास करणाऱ्या संशयिताला अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्यांच्याकडून सुमारे सव्वाचार लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. संशयिताने चोरीच्या घटनेबाबत चुकून एका ठिकाणी वक्तव्य केल्याने, पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली.
अधिक माहिती शी की, ताडेपुरा येथील रहिवासी रेखा अनिल लांडगे ही महिला २८ जुलै २०२१ रोजी मुलांसह बहादरपूर रोडवरील खळेश्वर कंजरवाड्यात हळदीच्या कार्यक्रमाला गेली होती. त्यानंतर तीन तासात चोरट्याने महिलेचे घर फोडून अडीच लाख रुपये रोख व दागिने मिळून सुमारे ७ लाख ९४ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. काही दिवसांपूर्वी या घटनेतील संशयिताने चोरी केल्याची बडबड एका ठिकाणी केली होती. त्याची माहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती. त्यांनी पोलिस नाईक मिलिंद भामरे यांना संशयित नीलेश विनोद माछरे याच्यावर पाळत ठेवण्यास सांगितले. संशयिताने काही दिवसांपुर्वी सोने विकले होते. तसेच त्याची आई व पत्नीने नवीन सोने खरेदी केल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी ८ रोजी त्याला अटक केली. पोलिसांनी या गुन्ह्यात एकूण ८५ ग्रॅम दागिने जप्त केले आहे.
पोलीस कोठडी
संशयिताने सुरत येथे नेमाराम चौधरी याला चोरीचे सोने विकल्याची कबुली दिली. त्यानुसार हेडकॉन्स्टेबल किशोर पाटील, मिलिंद भामरे, सिद्धांत शिसोदे, सूर्यकांत साळुंखे यांनी सुरत गाठून नेमाराम याच्याकडून १ लाख ५५ हजार रुपयांची ३० ग्रॅम सोन्याची लगड जप्त केली. तसेच चोरीतील पैसे व सोनाराने दिलेले पैसे एकत्र करून संशयिताने आई शितल विनोद कंजर व पत्नी प्रियंका नीलेश माछरे यांनी, ३ लाख ५५ हजार रुपयांचे नवे दागिने बनवल्याची कबुली दिली. त्यानुसार दोन्ही महिलांना अटक केली आहे. संशयित नीलेशसह त्याची आई व पत्नी अशा तिघांना न्यायालयाने १२ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.