⁠ 
शनिवार, मे 4, 2024

आदिवासी एकता प्रतिष्ठान : केवळ एक रुपयात लावणार लग्न

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२२ । यावल तालुक्यातील सावखेडा सिम येथील आदिवासी एकता प्रतिष्ठानने दोन वर्षांनंतर यंदा आदिवासी तडवी भील समाज सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. त्यात समाजाची ढासळलेली आर्थिक स्थिती पाहता सर्वसामान्यांना दिलासा मिळावा म्हणून केवळ एक रुपयात सामूहिक विवाह लावण्यात येईल. येत्या ७ मे रोजी हा सामूहिक विवाह सोहळा होईल.

कन्यादान योजनेचा लाभ

कोरोना संकटामुळे दोन वर्षांपासून आदिवासी एकता प्रतिष्ठानचा सामूहिक विवाह सोहळा रद्द होता. यंदा निर्बंध शिथिल झाल्याने सामूहिक विवाह सोहळा होईल. मात्र, कोरोनामुळे अनेकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुकांना केवळ एक रुपयांत नाव नोंदणी करून सामूहिक सोहळ्यात विवाह लावता येतील. येत्या ७ मे रोजीच्या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या जोडप्यांना कन्यादान योजनेचा लाभ मिळेल. मात्र, विवाह सोहळ्यात कायदेशीरपणे वधू-वरांचे वय पूर्ण असावे. कन्यादान योजनेसाठी कागदपत्रे गरजेचे आहेत.

दिलासा देण्याचा प्रयत्न

समाज बांधवांना दिलासा मिळावा म्हणून केवळ एक रुपयात लग्न लावण्याचा निर्णय घेतला. सोहळ्याचा संपूर्ण खर्च दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून होईल, असे आयोजक शरीफ तडवी, नवाज तडवी, जावेद तडवी, रमजान तडवी, शाहरुख तडवी, मोसिन तडवी, बिस्मिल्ला तडवी, नसीम तडवी, असलम तडवी, समीर तडवी, हुसेन तडवी, बिलाल तडवी, रफिक तडवी, फिरोज तडवी यांनी सांगितले.