जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२२ । तीन वर्षांपूर्वी रेल्वे हद्दीतील अतिक्रमण काढल्याने अनेक कुटुंब बेघर झाले. यासोबतच शहरातील अल्प उत्पन्न गट व वर्षानुवर्षे भाड्याच्या घरात राहणाऱ्या गरजुंसाठी म्हाडाच्या माध्यमातून ७ हजार ६०० घरांच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात ३,६०० घरे उभारली जातील, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. प्रा.सुनील नेवे यांच्या निवासस्थानी ही पत्र परिषद झाली. खडसे म्हणाले की, शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेतील बेघर व गरजूंच्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी तापी खोऱ्यातील राहूल नगरच्या उत्तरेकडील सर्वे क्रमांक ६३ या पार्कसाठी आरक्षित जागेवर म्हाडाच्या माध्यमातून गृहनिर्माणाचा प्रस्ताव दिला होता. ३५५ स्केअर फुटाच्या घराची किंमत सुमारे १३ लाख ५० हजार रुपयांपर्यंत जात होती. या प्रकल्पात पालिकेने रस्ते, गटारी, पथदिवे आदी सुविधेची हमी घेतल्याने ही किंमत ९.५० लाखांवर आली. ही रक्कम देखील जास्त असल्याने त्यात अजून काय सवलत देता येईल? यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रयत्न केला. नंतर मुंबईत तीन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत २ लाख रुपये कामगार महामंडळ, तर २.५ लाख रुपये प्रधानमंत्री आवास योजनेतून मिळवता येतील, यावर चर्चा झाली. दिल्लीत खासदार रक्षा खडसे यांनी हा प्रस्ताव देवून त्याला मंजुरी मिळवली. यामुळे आता पात्र लोकांना केवळ साडेपाच लाखांत घर मिळेल. हे साडेपाच लाख रुपये लाभार्थींना घर तारण ठेवून हौसिंग फायनान्सकडून दीर्घ मुदतीसाठी घेता येतील. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी मिळाली. हा देशात सर्वात मोठा प्रकल्प असेल. तसेच मंत्री मंडळाची परवानगी मिळवून सर्वे क्रमांक ६३ वरील पार्कचे आरक्षण काढण्यासाठी प्रयत्न आहेत. हे आरक्षण निघाले नाही तर दुसऱ्या पर्यायी जागा देखील उपलब्ध आहेत. जागा बदलीचा प्रस्ताव देवून गृह प्रकल्पाचे काम सहा महिन्यांत सुरु करण्यावर भर असल्याचे खडसे म्हणाले. माजी नगरसेवक प्रा.सुनील नेवे, अॅड.बोधराज चौधरी, रिपाइं उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, अनिकेत पाटील, प्रा. प्रशांत अहिरे, पुरूषोत्तम नारखेडे, शे.शफी शे.अजीज, अनिकेत पाटील, सुमित बऱ्हाटे, पृथ्वीराज पाटील, लक्ष्मी मकासरे, सविता मकासरे, विजय सुरवाडे, विशाल नारखेडे, हिमांशू दुसाणे, दिनेश नेमाडे उपस्थित होते. |