गृहमंत्र्यांच्या निष्क्रियतेमुळे महाराष्ट्राचा बिहार झाला – ॲड.रेवण भोसले
जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२२ । महाराष्ट्रात दिवसेंदिवस गुन्हेगारीत वाढ होत असून दिवसाढवळ्या खून, दरोडे, लूटमार तसेच पोलिसावर व राजकीय पुढारीवरही हल्ले होत असून कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे काढून महाराष्ट्राचा बिहार होण्यास जबाबदार असणारे निष्क्रिय ग्रहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची गृहमंत्री पदावरून तात्काळ हकालपट्टी करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहखाते स्वतःकडे घेण्याची मागणी जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व त्यांच्या कुटुंबावर हल्ला झाल्यानंतर राज्याच्या गृहमंत्र्याला जाग येते यापेक्षा निष्क्रियता आणखी दुसरी कोणती असू शकते ?पोलिसावर गृहमंत्र्यांचा कसलाही वचक नसल्यामुळे खुनी हल्ल्याचे सत्र, चोऱ्या, घरफोड्याची मालिका व महिला अत्याचार तसेच नांदेड येथे तर बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची खंडणीसाठी भरदिवसा गोळ्या घालून हत्या झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात तर सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या आमदारांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा पाढाच वाचला होता. राज्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर गृहखात्याचे कसलेही नियंत्रण नसल्यामुळे कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे रसातळाला गेली असल्याचे स्पष्ट दिसत आहे .अवैद्य धंदे व दारू विक्री, जुगार, घरफोड्यांच्या घटनाही सातत्याने घडत आहेत .महाराष्ट्राची स्थिती बिहार पेक्षाही वाईट झाली असून कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघण्यास जबाबदार असणारे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करण्याची मागणी ॲड भोसले यांनी केली आहे.