जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२१ । रेमडेसिवीर औषधी निर्मात्या कंपन्याकडून होणारा औषधींचा पुरवठा व प्रत्यक्षात वापर यात निर्माण झालेली तफावत तसेच बाधित रूग्णांत अचानक झालेली वाढ यामुळे औषधीचा तुटवडा निर्माण होण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे खाजगी वैद्यकिय व्यावसायिकांनी भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नवी दिल्ली यांनी दिलेल्या निर्देशांनुसारच रेमडेसिवीर औषधींचा वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
रेमडेसिवीर औषधी निर्मात्या कंपन्याकडून औषधीचा पुरवठा नियमितपणे होणेबाबत केंद्र व राज्य शासनाच्या स्तरावरुन प्रयत्न सुरु आहे. तर स्थानिक स्तरावरुनही जिल्हा प्रशासन नियमित रेमडेसिवीर औषधी निर्मात्या कंपन्यांच्या संपर्कात आहे.
अत्यवस्थ रुग्णांना वेळीच रेमडेसिवीर औषधींचा पुरवठा व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून युध्दपातळीवर सर्वोतपरी प्रयत्न सुरु असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी सांगितले.
तथापि, खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी रेमडेसिवीर औषधींचा अनावश्यक वापर थांबवुन भारतीय आयुर्विज्ञान संस्थानच्या निर्देशांनुसार आवश्यक रुग्णांनाच रेमडेसिवीर औषधी पुरवावे. प्रशासन सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याने रूग्णांच्या नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये. असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.