जळगाव लाईव्ह न्यूज । सागर निकवाडे । सातपुड्यातील कल्पवृक्ष म्हणून सुपरिचित असलेल्या मनमोहक मोहाच्या फुलांचा हंगाम सुरु झाला असून यामुळे भर उन्हाळ्यात आदिवासींना रोजगार उपलब्ध झाला आहे. सध्या बाजारात मोहाचे फुले विक्रीला आले असून ३५ ते ४० रुपये दराने व्यापारी खरेदी करत आहे.
सातपुड्यात अनेक औषधी वनस्पती दिसून येतात, यामध्ये मोहाच्या फुलांचा देखील आयुर्वेदिक औषधी म्हणून वापर होतो. तालुक्यात मोहाचे अनेक वृक्ष आढळून येतात. साधारणता चैत्र पौर्णिमेपासून मोहाची झाडे फुलं, फळांनी बहरतात व पुढे पंधरा ते वीस दिवस हंगाम सुरु राहून झाडांना फुले उमलतात.मोह हा पानगळती प्रकारातला मोठा वृक्ष आहे.रात्री उमलनार्या मोहाच्या फुलांनी बहरलेल्या झाडावरून पहाटे पासून फुले झडण्यास सुरुवात होते.या काळात मनाला तरारी देणार्या, उत्साह वाढवणारा मनमोहक मोहाच्या फुलांचा सुगंध संपूर्ण सातपूडयात दरवळतो. साधारणता एक झाड हजाराहून अधिक फुले देतो. जमिनीवर सडयासारखी पडलेली फुले वेचण्यासाठी आदिवासी कुटुंब अबालवृद्धांसह सकाळपासूनच रानात दाखल होतात.मोहाची फुले वेचण्यासाठी कुटुंबातील सर्वच सदस्य उन्हातान्हाची पर्वा न करता गर्क असल्याचे चित्र आहे. आदिवासी बांधव आपल्या उपजीविकेचे साधन म्हणून वर्षभर मोहाच्या वृक्षांची देखभाल करत हक्काने फुले गोळा करून त्यातून आपला चरितार्थ चालवतात. साधारणता महिनाभर आदिवासी बांधवांना उदरनिर्वाहाचे साधन म्हणून मोहाची वृक्षे महत्वाची भूमिका बजावतात.
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबाचे राहणीमान व जीवनमान उंचावण्यासाठी मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत ‘मोहफूल-आदिवासी उपजीविकेचे एक साधन’ हा प्रकल्प राबविण्यास राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी मंजुरी दिली आहे. जिल्ह्यातील वन धन केंद्रामार्फत शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ हा प्रकल्प राबविणार आहे. आदिवासी कुटुंबाचे सशक्तीकरण व्हावे आणि ते आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे यासाठी हा प्रकल्प राबविण्यासाठी हे प्रकल्प तयार केले आहे. मोहफूल हे या भागातील आदिवासी कुटुंबाचे उपजीविकेचे हे एक साधन आहे. राज्य शासनाने नुकतेच मोहफुलांवरील निर्बंध हटविले आहेत. मोहफुलाचे आदिवासी बांधवांच्या जीवनातील महत्व ओळखून मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.मात्र, योजना घोषित झाल्यापासून गेल्या वर्षभरात प्रशासकीय पातळीवर कुठल्याही हालचाली दिसून न आल्याने स्थानिकांमध्ये नाराजीचा सुरु दिसून येत आहे.
आदिवासिंचा कल्पवृक्ष मोह
मोहाच्या वृक्षाचे अनेक फायदे आहेत, आदिवासी बांधव या मोह वृक्षास आयुर्वेदिक वनस्पती म्हणूनही वापरतात. अनेक औषधी गुणधर्म असलेल्या मोहाच्या फुलांचा वापर खाण्याच्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात येतो.यापासून भाजी व भाकरीतही त्याचा वापर होतो, त्याच प्रमाणे मोहाच्या बीयांपासुन तेलही काढले जाते. या तेलाचा वापर स्वयंपाकासाठी केला जातो. फुलांमध्ये केल्शियम,जीवनसत्वे व पोषक द्रव्ये भरपूर प्रमाणात असतात. तसेच फुलांचा वापर शुद्ध अल्कोहोल मिळविण्यासाठीही केला जातो. कच्ची फुले वेचून ती दोन ते तीन दिवस वाळवून स्थानिक बाजार पेठेत ३५ ते ४० रुपये प्रती किलो दराने घावूक व्यापाऱ्यांना विकली जातात. दिवस भरात साधारणता एका वृक्ष पासून १२ ते १५ किलो मोहाची फुले मिळतात.
गर्भवती आणि स्तनदा मातांना मोह हे उत्कृष्ट पोषण स्तोत्र आहे. यातून त्यांना चांगले पोषण आहार मिळते. मोहापासून अनेक घरगुती वापरासाठीची उत्पादने तयार करता येतात.
दूष्काळात दिला मोहाच्या फूलांनी आधार
सन १९७१च्या भिषण दूष्काळात सातपूडयात अन्नधान्याचा प्रचंड तूटवडा असतांना, आदिवासी बांधवांनी रानातील फळे, फूले खावून दूष्काळाचा सामना केला. यात मोहाच्या फूलांची भाजी बनवून खाण्यासाठी मोठया प्रमाणात वापर करण्यात आल्याची माहीती काही वृध्द आपल्या आठवणी सांगतांना देतात. मोहाची कच्ची फूले आरोग्यवर्धक मानली जातात तर काही प्रमाणात वाळवलेल्या फूलांपासुन मेन तयार केले जाते.
सध्या लॉक डाऊन शिथिल झाले असले तरी रोजगाराची समस्या कायम आहे. त्यातच सध्या मोहाचा हंगामात महिनाभर रोजगार मिळतो, परंतु यात फुलांना हमी भाव नसल्याने मिळणारे उत्पन्न देखील तुटपुंजे आहे. शासनाने हंगामी फळा –फुलांच्या खरेदी विक्रीस परवानगी द्यावी जेणेकरून आदिवासी बांधवाना कायम आर्थिक हातभार लाभेल. मोहफुलांच्या माध्यमातून आदिवासी कुटुंबाचे आर्थिक सक्षमीकरण होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून मोहफूल प्रक्रिया उद्योग सुरू झाल्यास आदिवासी संस्थाचा व त्या भागाचाही विकास होईल. तसेच आदिवासी बांधवांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावेल – प्रा.बटेसिंग पावरा