गांजा तस्करी करणाऱ्या तरुणास पोलीस कोठडी
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ । अप नवजीवन एक्स्प्रेसमधून भुसावळ स्थानकावर उतरलेल्या २१ वर्षीय प्रवाशाकडून रेल्वे सुरक्षा बलाने मंगळवारी ३३ हजारांचा गांजा पकडला होता. या संशयिताला बुधवारी रेल्वे न्यायालयात हजर केल्यावर पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
ज्ञानेश्वर प्रकाश राठोड (वय २१, रा.नेरे रायगड) असे तरुणाचे नाव आहे. राठोड हा मुंबईतील एमपीआयएल कंपनीत नोकरीला आहे. त्याने हा गांजा मित्र धोंडवा याने ब्रह्मपूर, बालिगुडा (ओडिशा) येथे दिल्याचे पोलिस चौकशीत कबूल केले आहे. त्यामुळे लोहमार्ग पोलिस गांजा प्रकरणाच्या तपासासाठी ओडिशा व मुंबईला जाणार आहे. दरम्यान, गत सहा महिन्यात रेल्वेतून गांजा, पिस्तूल तस्करीचे प्रकार उघडकीस येत आहेत. त्यामुळे यंत्रणा अलर्ट झाली आहे. राठोड प्रकरणाचा तपास लोहमार्गचे पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय साळुंखे करत आहेत.