डॉक्टरांनी उपचाराकडे दुर्लक्ष केल्याचा नातेवाईकांचा आरोप
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२२ । येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णाकडे लक्ष न दिल्याने डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
मयताच्या नातेवाईकांनी दिलेली माहिती नुसार, अवचित काळु तायडे (वय ४६ रा.समतानगर) हे उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल होते. त्यांचा दि. ४ एप्रिल रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. अवचित काळे हे मजुरी काम करतात. सोमवारी दुपारी त्यांची प्रकृती अचानक खालावली. डाव्या बाजूने पॅरालिसिस सारखा त्रास जाणवत असल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. या ठिकाणी डॉक्टरांनी पाहिजे ते उपचार अवचित काळे यांच्यावर करणे अपेक्षित होते मात्र त्यांनी दिवसभर केवळ सलाइन लावून ठेवले तर रात्री ऑक्सीजण लावला. मात्र ऑक्सिजनची नळी मशीनला न लावता जमिनीवर पडलेली असल्याचे दिसून आले. याबाबतचा व्हिडिओसुद्धा नातेवाईकांकडे आहे. त्यानंतर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी अचानक हॉस्पीटलमध्ये मेंदूचा डॉक्टर नसल्याचे उत्तर नातेवाईकांना दिले तसेच त्यांना दुसऱ्या ठिकाणी उपचारासाठी न्यावे लागेल असे सांगितले. याच दरम्यान अवचित काळे यांचा मृत्यू ओढवला.
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच अवचित काळे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मयताचे जावई सुनील पवार, भाचा विकास अडकमोल, पुतण्या उत्तम तायडे यांनी केला आहे. संबंधित डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणीही अवचित यांच्या नातेवाईकांनी केली असून याबाबत पोलिसांत तक्रार देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ज्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला त्या डॉक्टरांवर कारवाई करावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा रुग्णालयासमोर तीव्र आंदोलन करेल असा इशाराही या वेळी महानगराध्यक्ष अडकमोल यांनी दिला आहे. मयत अवचित काळे यांच्या पश्चात पत्नी शारदा , मुलगा राहुल तसेच विवाहित मुलगी असा परिवार आहे.